अलीकडे मराठीसह अनेक हिंदी कलाकार यूट्यूब या माध्यमावर आले आहेत. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच ही कलाकार मंडळी आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी स्वत:च्या यूट्यूब चॅनेलद्वारे शेअर करत असतात. शिवाय त्यांच्या चाहते मंडळींनादेखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्यात रस असतो. अशातच बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) यूट्यूबवर स्वत:च चॅनेल सुरू केलं आहे.
अभिनेता आमिर खानने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यानंतर आता तो त्याने केलेल्या भूमिकांमागची गंमत, मेहनत, कष्ट आणि त्याबद्दलचा एक वेगळा विचार सांगण्यासाठी यूट्यूब या माध्यमावर येत आहे. याबद्दल अभिनेत्याने स्वत: माहिती दिली आहे. आमिरने त्याच्या स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि याबद्दलची माहिती दिली आहे.
या व्हिडीओमध्ये आमिरने असं म्हटलं आहे की, ‘गेल्या खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विचार येत होता की, मी माझ्या करिअरमध्ये जे काही चित्रपट केले, जे काही काम केलं, त्याचे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. प्रत्येक खास सीनमागे एक घटना असते, एक विचार असतो आणि हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक असं माध्यम बनवावं; पण मी आजपर्यंत हे असं करू शकलो नाही. मी वेबसाइट तयार केली, पण त्याचं काही पुढे झालं नाही.”
यापुढे त्याने स्वत:च्या यूट्यूब चॅनेलची घोषणा करत म्हटलं की, “आता शेवटी आम्ही ‘आमिर खान टॉकीज’ नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. याचा विचार मी अनेक वर्षांपासून करत होतो. यावर दिग्दर्शकांचा विचार, कलाकारांचे विचार आणि तंत्रज्ञ मंडळींबद्दलच्या अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसंच यामागे आणखी एक विचार होता की, या सगळ्या गप्पा मी स्वत:च प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाव्या, त्यामुळे माझ्या आणि माझ्या चाहत्यांमध्ये हा संवाद व्हावा म्हणून हे सगळं केलं आहे, आशा आहे तुम्हाला ते आवडेल.”
दरम्यान, आमिर खानच्या या यूट्यूब चॅनेलबद्दल त्याच्या चाहते मंडळींनी चांगलीच उत्सुकता व्यक्त केली आहे. त्याच्या या नवीन यूट्यूब चॅनेलवर येणाऱ्या दिग्दर्शक, कलाकार मंडळींसाठीही अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत, त्यामुळे आता आमिर या नवीन् यूट्यूब चॅनेलची सुरुवात कधीपासून करणार? या यूट्यूब चॅनेलवर कोणते नामांकित चेहरे दिणार, हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.