Aamir Khan : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कामगिरी करताना दिसत नाहीयेत. अनेक बड्या कलाकारांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसववर उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपुर्वी आलेला सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट चांगली कामगिरी करेल असं वाटलं होतं. पण त्याला तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘सिकंदर’ने २४ एप्रिल म्हणजे आजच्या तारखेला भारतात ११० कोटी आणि जगभरात १८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सध्याच्या चित्रपटांबद्दल आमिर खानचं स्पष्ट मत
विकी कौशलच्या ‘छावा’नंतर तसा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसा चांगला गल्ला जमवू शकलेला नाही. प्रादेशिक चित्रपटांच्या तुलनेत हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवरील संख्येच्या आणि चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत छाप पाडण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, मल्याळम, तमिळ, तेलुगू वा कन्नडमधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. या सगळ्या परिस्थितीवर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“इतर इंडस्ट्रीमधून शिकण्यासाठी सुधारण्यासाठी वाव”
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूड चित्रपटांबद्दल असं म्हणाला की, “मी असे म्हणत नाही की, बॉलीवूडमध्ये चांगले चित्रपट निर्माण होऊ शकत नाही. पण मला वाटते की, चित्रपट निर्माते म्हणून आपल्यासाठी इतर इंडस्ट्रीमधून शिकण्यासाठी आणि त्यातून सुधारणा करण्यासाठी खूप वाव आहे. मी १९८८ मध्ये या इंडस्ट्रीत आलो तेव्हा माझ्या मते चित्रपटांची संख्या खूपच कमी होती. पण त्यानंतर बरीच सुधारणा झाली आहे. ९० च्या दशकानंतर आता प्रेक्षक बदलले आहेत. त्यांना मनोरंजनाच्या वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेत.”

“मी सगळ्या गोष्टी बदलू शकतो असं माझं म्हणणं नाही”
यापुढे आमिरला बॉलीवूड सुधारण्यासाठी काय करू शकतो असे विचारले असता, तो म्हणाला की, “मी जे करत आहे तेच मी करू इच्छितो. मी त्या गोष्टी सांगू इच्छितो, ज्यावर माझा विश्वास आहे. मी सगळ्या गोष्टी बदलू शकतो असं माझं म्हणणं नाही. माझे स्वतःबद्दल असे मत कधीच नव्हते आणि नसेलही. कारण चित्रपट बनवणे खूप कठीण आहे. त्यामुळे मी असा एक तरी चांगला चित्रपट करणे ही माझ्यासाठी सध्या तरी खूप मोठी गोष्ट आहे.”
आमिर खानच्या आगामी कामाबद्दल…
दरम्यान, आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाटुन्न प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा नवीन चित्रपट ‘चॅम्पियन्स’ या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आमिर ‘लाहोर १९४७’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.