बॉलीवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच आयरा आणि नुपूरने गुपचूप साखरपुडा केला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता आयराच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. लेकीच्या लग्नानंतर आमिर खान एक भव्य रिसेप्शन देणार आहे. रिसेप्शनची तारीख आणि जागेबाबतची माहिती समोर आली आहे.
आयराच्या लग्नानंतर आमिर खान १३ जानेवारी २०२३ ला मुंबईत भव्य रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिसेप्शन पार्टीत बॉलीवूडमधील कलाकार आणि मित्र मंडळींना आमंत्रित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमिरने आयराच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. ३ जानेवारी २०२४ ला आयरा आणि नुपूर लग्न करणार आहेत. ‘न्यूज १८ इंडिया’शी बोलताना आमिरने याबाबत घोषणा केली होती. एवढंच नाही तर लेक आयराच्या लग्नात मी खूप रडणार असल्याचेही आमिर म्हणाला.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. आयरा अनेकदा आपल्या सोशल मीडियावर नुपूरबरोबरचे फोटो शेअर करत असते. नुपूर एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देतो. इटलीमध्ये झालेल्या ‘आयर्न मॅन, इटली’ स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान त्याने सगळ्यांसमोर आयराला प्रपोज केले होते.