‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान हा बरेच दिवस मीडियासमोर आला नाही. नुकतंच मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो पुन्हा चर्चेत आला. ‘पापा कहते है’वरचा त्याचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मध्यांतरी एका मुलाखतीमध्ये आमिरने अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या याच संपूर्ण प्रवासाबद्दल यूट्यूबवरील ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.
याबरोबरच आमिरने या मुलाखतीमध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाशी निगडीत काही किस्सेदेखील शेअर केले आहेत. आमिरचं कुटुंब हे याच क्षेत्रात असल्याने त्याच्या घरच्यांनीच त्याला लॉंच केलं. आमिरबरोबर या चित्रपटातून जुही चावलानेदेखील पदार्पण केलं. या दोघांची कामं लोकांनी खूप पसंत केली.
आणखी वाचा : “हीच अभिनेत्री माझी जागा घेण्यास पात्र” ‘द कपिल शर्मा शो’दरम्यान अर्चना पूरण सिंग यांचा खुलासा
या चित्रपटाला तब्बल ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. साऱ्या देशभरातून आमिर आणि जुहीला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. याविषयी बोलताना आमिर खान म्हणाला, “मी कधीच पुरस्कारांच्या मागे धावलो नाही. माझ्या मनात पुरस्कारांबाबत अजूनही संशय आहे. त्यावेळी हा चित्रपट करताना तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी या चित्रपटाच्या निमित्ताने बरंच शिकलो. मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याआधी मी सहायक म्हणूनही काम केलं होतं. त्यावेळी मला या चित्रपटासाठी १००० रुपये प्रती महिना मिळायचे आणि माझ्यासाठी तेवढे पुरेसे होते.”
हा चित्रपट तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. आमिर आणि जुही रातोरात स्टार झाले. शिवाय ‘कयामत से कयामत तक’मधील स्वतःच्या कामापेक्षा जुही चावलाचं काम उत्तम झालं होतं हेदेखील आमिरने या मुलाखतीदरम्यान मान्य केलं. आमिरने सध्या अभिनयातून ब्रेक घेतला असला तरी तो काजोलच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.