बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असणारा अभिनेता आमिर खान(Aamir Khan) काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तो त्याच्या व्यावसायिक नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतीच त्याने माध्यमांसमोर तो प्रेमात असल्याची, रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. तसेच त्याने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळखदेखील करून दिली. विशेष बाब म्हणजे आमिरची गर्लफ्रेंड गौरी व आमिर हे एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. गौरी व आमिर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आमिर खानने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केल्यानंतर तो मोठ्या चर्चेत आला होता. त्यानंतर आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. मात्र त्यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. नुकतीच आमिर खानने त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली. आमिर खानने १४ मार्चला ६० वा वाढदिवस साजरा केला. किरण रावने आमिर खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यावेळी तिने अनेक फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना किरण रावने लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! नेहमीच आमच्या पाठीशी असल्याबद्दल थँक्यू! आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.” किरण रावने शेअर केलेले काही फोटो हे आमिर खानबरोबर लग्न केले होते, तेव्हाचे आहे. याबरोबरच, त्यांचा मुलगा आझाद आणि आमिर यांचे काही फोटोदेखील पाहायला मिळत आहेत.

किरण रावच्या या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. घटस्फोटानंतरही त्यांच्यात ज्या पद्धतीचे नाते आहे, त्याचे कौतुक चाहत्यांनी केल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. काहींनी पोस्टचे कौतुक केले आहे; तर काहींनी आमिर खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

आमिर खान व किरण राव यांच्या नात्याबद्दल बोलायचे, तर त्यांनी २००५ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र त्यांनी २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगादेखील आहे आणि त्याचे नाव आझाद, असे आहे. ते त्यांच्या मुलाचे सहपालकत्व निभावत आहेत. किरण रावबरोबर आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. याआधी त्याने रीना दत्ताबरोबर लग्न केले होते. १९८६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती; मात्र २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना इरा खान व जुनैद खान अशी दोन मुले आहेत.

दरम्यान, गुरुवारी मीडियाशी संवाद साधताना आमिर खानने गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. तसेच ते दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासाही केला.