दिवंगत स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीकने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने अधिकृतपणे वडील राज बब्बर यांचं नाव हटवलं आहे. तो आता त्याचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं लिहितो. काही दिवसांपूर्वीच लग्न करणाऱ्या प्रतीकच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा होत आहे. वडिलांचं नाव हटवण्यामागचं कारणही त्याने सांगितलंय, त्यानंतर त्याचा सावत्र भाऊ व राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतीकने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. या विवाह सोहळ्यात त्याने वडिलांना व सावत्र भाऊ आर्य बब्बरला निमंत्रित केलं नव्हतं. त्याने बब्बर कुटुंबातील कुणालाच लग्नात न बोलावल्याने बरीच चर्चा झाली. भाऊ आर्यने तर नाराजीही व्यक्त केली होती. प्रतीकच्या या कृतीतून त्याचं वडिलांशी बिनसलंय हे दिसून आलं. याचदरम्यान आता त्याने वडिलांचे नाव हटवून आईचे नाव लावले आहे. त्यावर आर्य बब्बरने प्रतिक्रिया दिली आहे. आडनाव बदलल्याने अस्तित्व संपत नाही असा टोला आर्यने प्रतीकला लगावला.
अस्तित्व बदलता येणार नाही – आर्य बब्बर
‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना आर्य बब्बर म्हणाला, “मला एवढंच म्हणायचंय की स्मिता मां आमचीही आई आहे. त्याला (प्रतीकला) कोणतं नाव लावायचंय आणि कोणतं नाही हा त्याचा निर्णय आहे. उद्या मी माझं नाव आर्य बब्बरवरून आर्या करेन किंवा राजेश असं ठेवेन, तरीही मी बब्बरच राहणार आहे. तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, तुमचे अस्तित्व नाही. मी नेहमीच बब्बरच राहीन कारण माझे अस्तित्व तेच आहे, ते बदलता येणार नाही.”

कौटुंबिक वादाबद्दल आर्य म्हणाला, “आमच्या कुटुंबावर लोकांच्या नजरा असतात, त्यामुळे चर्चा होणारच. त्याबद्दल आम्ही काही बोलूही शकत नाही आणि करूही शकत नाही. आणि खरं तर आम्हाला या गोष्टीची अडचणही नाही. आम्ही ठीक आहोत. इंडस्ट्रीत असण्याचा हा एक भाग आहे. आम्ही पब्लिक प्रॉपर्टी आहोत. हा आमच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्याबद्दल आम्ही खरोखर काहीचं करू शकत नाही. याचा फार विचार करू नये. एकच आयुष्य आहे, जगा आणि आनंदी राहा.”
दरम्यान, प्रतीक नाव हटवण्याबद्दल म्हणाला, “मला परिणामांची पर्वा नाही. हे नाव ऐकल्यावर मला कसं वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला पूर्णपणे माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारशाशी जोडलेलं राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही, तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय.”