दीपक तिजोरी हा १९९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता होता. त्याचे अनेक चित्रपट हिट ठरले. ‘आशिकी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हा कभी ना’ यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. पण नंतर दीपकच्या वैवाहिक आयुष्यात अशी घटना घडली, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

२०१७ मध्ये अशा बातम्या आल्या की दीपकला त्याची पत्नी शिवानी तिजोरी हिने गोरेगाव येथील त्याच्या घरातून हाकलून दिलं होतं. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शिवानीला होता. शिवानीने त्याला घरात फक्त एका खोलीत राहू दिलं होतं. तसेच घरातील कर्मचाऱ्यांना बजावलं होतं की त्यांनी दीपकला जेवणही देऊ नये. त्यानंतर दीपकला त्याच्या मित्राची मदत घ्यावी लागली होती, तो मित्राकडे राहायला गेला होता.

शिवानीने दीपकपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता आणि पोटगी मागितली होती. पण हे लग्न कायदेशीररित्या वैध नसल्याचा दावा दीपकने केला आणि या घटस्फोटाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला होता. ‘बॉलीवूड शादी’च्या वृत्तानुसार, दीपकने सांगितलं की शिवानीशी त्याचं लग्न कायदेशीररित्या वैध नाही. कारण शिवानीने लग्न करण्यापूर्वी तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता, त्यामुळे त्यांचे लग्न रद्दबातल ठरते. हा खुलासा झाल्याने या दोघांच्या नात्यातील गुंतागुंत आणखी वाढली आणि शिवानीने पोटगी मागितली होती त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

शिवानीच्या बहिणीने काय म्हटलं होतं?

दीपकने या आरोपांबाबत मौन बाळगलं होतं. तर शिवानीची बहीण अभिनेत्री कुनिका सदानंदने दीपक व शिवानीचं लग्न अवैध असल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. “एखादी व्यक्ती इतक्या वर्षांपासून विवाहित आहे आणि अचानक आपलं लग्न वैध नाही असं समजतं का? मला खात्री आहे की यामागे कोणाचा तरी हात आहे. अशा गोष्टी आमच्यासारखी नव्या नाही. कारण न्यायालय पुराव्याच्या आधारे निर्णय घेईल. कोणीतरी घटस्फोट व पोटगीसंदर्भात न्यायालयीन खटल्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे,” असं कुनिका सदानंद म्हणाली होती.

deepak tijori wife shivani
दीपक तिजोरी व त्याची पत्नी शिवानी (फोटो – सोशल मीडिया)

दीपकला शिवानीने घरातून हाकलून दिल्याच्या वृत्ताचेही कुनिकाने खंडन केले होते. तो त्याच घरात काही वेळ राहायचा तर बाकी वेळ गर्लफ्रेंडबरोबर राहायचा, असं तिने म्हटलं होतं. “तो अजूनही तिथेच राहतो. तो येतो आणि जातो. त्याची एक गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे तो दोन्हीकडे राहतो. शिवानी त्याला कशी घराबाहेर काढू शकते? तो तिच्या बाळाचा बाबा आहे. घरात त्याची स्वतःची खोली आहे,” असं कुनिकाने म्हटलं होतं.

वाद जास्त वाढल्यावर शिवानीने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आणि दीपकच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. “दीपक तिजोरी माझे २२ वर्षांहून जास्त काळ पती आहेत आणि ते माझ्या मुलीचे वडील आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी सभ्यता, नैतिकता, संवेदनशीलता, कायदेशीरतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत,” असं शिवानी म्हणाली होती. प्रकरण कोर्टात असल्याने तिने त्यासंदर्भात जास्त बोलण्यास नकार दिला होता.

दरम्यान, दीपक दिजोरी मागील काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता लवकरच त्याची मुलगी समारा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader