‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेता आसिफ शेख याची बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानशी जवळची मैत्री आहे, आसिफने सलमानबरोबर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आसिफ शेखने सलमान खानबरोबरच्या आपल्या मैत्रीवर भाष्य केले आणि त्याने सेटवर अनुभवलेले काही मजेशीर किस्से शेअर केले. आसिफने सांगितलं की, सलमान त्याला ‘मारीयल’ आणि ‘सुखंडी’ अशी मजेदार टोपणनावे ठेवतो.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आसिफ शेखने खुलासा केला की, सलमान त्यांना ‘मारीयल’ आणि ‘सुखंडी’ का म्हणतो. “सलमानच्या घरातील सगळेजण बॉडीबिल्डर आहेत. आणि माझ्याकडे पाहा, मी किती बारीक आहे. जेव्हा कधी त्याला कोणाचं उदाहरण द्यायचं असतं की कोण बारीक आहे, तेव्हा तो मला ‘आसिफ शेखसारखा मारीयल’ म्हणतो. मीच बारीक माणसाचं प्रतीक आहे, त्यामुळे तो मला ‘सुखंडी’ म्हणतो.”
सलमानसह अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे आसिफच्या त्याच्याबरोबर अनेक आठवणी आहेत. सलमानच्या मजेशीर स्वभावाबद्दल सांगताना आसिफने १९९७ मध्ये हैदराबादमध्ये ‘औजार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला.
तो म्हणाला, “माझा एक मित्र नवीन गाडी घेऊन आला होता. ती गाडी मला दाखवायला आला, तेव्हा सलमानने त्याला म्हटलं, ‘दे मला, टेस्ट ड्राईव्ह करू दे’. सलमानने गाडी चालवायला सुरुवात केली आणि माझा मित्र घाबरून गेला. सलमानने गाडी इतक्या वेगात चालवली की माझा मित्र तर थोडक्यात वाचला! मात्र, तो काही बोलू शकला नाही, कारण समोर सलमान खान होता.”
हेही वाचा… सलमान खानची बहीण अर्पिता व पती आयुष शर्माने ‘इतक्या’ कोटींना विकले वांद्रे येथील घर
आसिफ पुढे म्हणाला, “सलमानने मुद्दाम असं केलं होतं. नंतर त्याने माझ्या मित्राला विचारलं, ‘कसं वाटल ?’ हा खूप मजेशीर अनुभव होता.”
आसिफने आणखी एक किस्सा सांगितला, जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी ‘मैंने प्यार किया’ फेम सलमान खानला ओळखलं नाही. “आम्ही ‘बंधन’ चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्या वेळेस सलमानकडे एक इस्टीम गाडी होती. तो मला घेऊन गाडी चालवायला गेला आणि रस्त्यावरून फुटपाथवर गाडी चालवू लागला. मी घाबरून म्हटलं, ‘सलमान, आपण पकडले जाऊ ’. तेव्हा तो म्हणाला, ‘काय झालं तर! मी सलमान खान आहे, काळजी करू नकोस.”
आणि पोलिसांनी सलमानला ओळखलंच नाही
आसिफ म्हणाला, “आम्हाला लगेचच ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं. मग सलमानने खिडकी खाली केली आणि म्हणाला‘अरे भाई’ पण त्या पोलिसाने खरंच त्याला ओळखलं नाही. सलमानला धक्का बसला. मी म्हणालो, ‘कदाचित शर्ट काढ, मग ओळखेल.’”
सलमान खानबरोबर काम करणं म्हणजे एक प्रकारची पार्टीच असल्याचं म्हणत आसिफ म्हणाला, “मला माहीत नाही लोक सलमानबद्दल काय विचार करतात, पण तो खूप आनंदी आणि मोकळा स्वभावाचा माणूस आहे. तो सर्वांशी खूप मोकळेपणाने बोलतो. त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. तो खूप प्रामाणिक आहे. जर तुम्ही काही चूक केली तर तो तुमच्यावर उघडपणे रागवतो, पण चांगलं केलं तर प्रेमाने आलिंगन देऊन कौतुक करतो.”
‘भाबीजी घर पर हैं’ साइन केल्यानंतर सलमानने स्वतः त्याला फोन करून अभिनंदन केल्याचंही आसिफने सांगितलं. “त्याने मला फोन करून म्हटलं, ‘मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हा चांगला शो आहे आणि मला तो आवडला. मी काही एपिसोड्स पाहिले आणि खूप मनोरंजक वाटले.’ मी कधीच त्याच्याकडे काम मागायला जात नाही, तोच मला नेहमी त्याच्या चित्रपटांमध्ये काम देतो,” असं आसिफ शेख यांनी सांगितलं.