Aastad Kale : विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. प्रदर्शनाच्या पुर्वीपासूनच हा चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत होता. याबद्दल अनेक संमिश्र प्रतिक्रिया कलाकार व प्रेक्षक व्यक्त करत होते. याशिवाय शिर्केंच्या वंशजांनी देखील चित्रपटावर आक्षेप घेतला होता. अशातच काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेता आस्ताद काळेने ‘छावा’बद्दल एक पोस्ट शेअर केली होती. २ महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या चित्रपटातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले होते.

“‘छावा’ वाईट फिल्म आहे” असं म्हणत आस्तादने पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. अशातच आता या सगळ्यावर अभिनेत्याने भाष्य केलं आहे. राजश्री मराठीशी बोलताना त्याने याबद्दल सविस्तरपणे त्याचं मत मांडलं. याबद्दल तो म्हणाला की, “माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मत असण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मला तो चित्रपट आवडला नाही. माझा त्या पोस्टमधला शब्द चुकला असेल. ‘फिल्म वाईट आहे’ असं म्हणण्यापेक्षा ‘मला ती फिल्म आवडली नाही’ असं म्हणणं जास्त चांगलं ठरलं असतं.”

यापुढे तो म्हणाला, “यामुळे येणाऱ्या प्रतिक्रिया तशाच आल्या असत्या. त्याबद्दल माझं काही मत नाही. काही जणांनी मला वैयक्तिकरित्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विचारलं. त्यावर त्यांना मी माझं म्हणणं सांगितलं आणि त्यातल्या काहींना ते पटलंदेखील. मला त्या चित्रपटातलं काय आवडलं हे सांगतो, विकी कौशल या नटाने खूप कष्ट घेतले. खूप प्रमाणिकपणे त्याने काम केलं आहे. हे मी बोलू शकतो कारण, मी काही प्रसंगांमध्ये त्याच्याबरोबर काम केलं आहे. दुसरी गोष्ट सेट फार अप्रतिम होता. युद्धाचे काही प्रसंगही छान झाले. पण फक्त यामुळेच चित्रपट होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे.”

यानंतर त्याने म्हटलं की, “मी जे बोललो होतो, त्यात ऐतिहासिकदृष्ट्या काही सीन हे समस्यात्मक होते. बुऱ्हाणपूरची लूट आणि मग राज्याभिषेक, हे दोन्ही उलट घडलं होतं. आधी राज्याभिषेक झाला होता. १४, १५, १६ जानेवारी १६८१ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला होता आणि ३१ जानेवारी रोजी बुऱ्हाणपूरची लूट झाली. याबद्दल जाऊदेना… एवढं काय? असा विचार केला तर मग सगळ्याच बाबतीत हे लागू होतं. तुम्ही का इतिहासाची प्रतारणा करता? त्यातून साध्य काय होतं? दुर्दैवाने त्या काळात त्यांचं चरित्रहनन करण्याचे प्रयत्नही झाले. महाराजांनी येसूबाईंच्या नावाचाही तेव्हा शिक्का केला होता आणि ही खूप मोठी क्रांतीकारी गोष्ट आहे. याबद्दल तुम्ही का नाही दाखवू शकलात?”

यानंतर आस्ताद असं म्हणाला की, “मी हे अशासाठी बोलत आहे, कारण तुमच्याकडे ते आर्थिक, तांत्रिक बळ आहे. तुमच्या प्रोडक्शनमध्ये मोठमोठे कलाकार काम करण्यास तयार होतात. मग महाराजांच्या नऊ वर्षांच्या काळाबद्दल दोन चित्रपट करण्याचा निर्णय का नाही घेतला?. कसली घाई होती? ‘बाहुबली’सारखी काल्पनिक गोष्ट त्यांनी दोन भागांत सांगितली; मग महाराजांची गोष्ट तुम्हाला दोन भागांत का सांगावीशी वाटली नाही?. घ्या ना कष्ट… थोडे कष्ट घ्या. खूप वरवर आणि खोलात न जाता केलेला हा प्रयत्न होता जो मला आवडला नाही.”

यापुढे आस्तादने त्याच्या भूमिकेबद्दल असं म्हटलं की, “मला पूर्ण स्क्रिप्ट दिलं नव्हतं. माझ्या कास्टिंगसाठी फोन आले तेव्हा माझं हो… नाही… चाललं होतं. कारण ते काल्पनिक पात्र आहे. सुर्याजी निकम असं पात्र होऊन गेलेलं नाही. त्यांची नोंद तरी नाही. त्यासाठी थिएटर केलेले कलाकार असल्याचं सांगितलं गेलं होतं. मी त्यांना माझा सीन पाठवण्याची विनंती केली. तर ते नाही म्हणाले. ठीक आहे ते साहजिकच आहे. मग सेटवर तयार होऊन सीन वाचला तेव्हा लक्षात आलं की, फक्त दीड वाक्य आहेत आणि तयार होऊन मी नाही करणार हे बोलण्यासाठी माझी तशी शिकवण नाही. त्यामुळे मी ते केलं.”

यानंतर आस्ताद महाराणी सोयराबाई यांच्या चित्रपटातील भूमिकेबद्दल असं म्हटलं की, “साधी गोष्ट आहे की, चांगल्या घरातील स्त्री पुरुष बाहेर असतील, तर आजही बाहेर येत नाही. त्यात चारशे वर्षांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी भर दरबारात चार परपुरुषांबरोबर पान खातात हे कसं शक्य आहे. मला ट्रोलिंग होणार हे माहित होतं; पण ट्रोल करणाऱ्यांना या गोष्टी खटकत नाहीत का? छत्रपती संभाजी महाराजांना एका प्रतिमेत ठेवलं आणि तेच दाखवलं, कारण ते फायद्याचं आहे.”