बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा धाकटा मेव्हणा आणि अभिनेता आयुष शर्मा नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटांव्यतरिक्त , आयुष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आयुषने २०१४ सलमान खानची बहिण अर्पिता खानबरोबर लग्न केले. मात्र, लग्नानंतर आयुषला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आयुषने पैशांसाठी अर्पिताशी लग्न केले असल्याचा आरोप अनेकदा आयुषवर करण्यात आला आहे. मात्र, आता आयुषने लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला, “अर्पिता एक अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण महिला आहे आणि असा जोडीदार मिळणे ही एक खास गोष्ट आहे. ती जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते. लग्नावरुन होणाऱ्य़ा सततच्या ट्रोलिंगमुळे तिने कधीच स्वत:ला त्रास करुन घेतला नाही. कारण तिने या सगळ्या गोष्टी अगोदरपासून पाहिल्या आहेत. पण या गोष्टी माझ्यासाठी नव्या होत्या.”
आयुष पुढे म्हणाला, “मला सगळ्यात जास्त या गोष्टींचं वाईट वाटतं ते म्हणजे लोक म्हणायचे की मी अर्पिताशी पैशासाठी किंवा अभिनेता बनण्यासाठी लग्न केलं. पण माझं अर्पितावर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं. चांगली गोष्ट अशी होती की तिला हे माहित होते, मला ते माहित होते आणि आमच्या कुटुंबाला ते माहित होते.”
हेही वाचा- खऱ्या आयुष्यात विकी कौशलने कतरिनाचा मार खाल्लाय का? कपिल शर्माचा प्रश्न ऐकताच अभिनेता म्हणाला….
विशेष म्हणजे आयुष हिमाचल प्रदेशातील राजकीय कुटुंबातील आहे. त्यांचे आजोबा सुखराम हे कॅबिनेट मंत्री होते. आयुषने आतापर्यंत ‘लवयात्री’ आणि ‘अंतिम’ या दोन चित्रपटात काम केले आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी जादू दाखवू शकलेले नाहीत.