Manoj Kumar Funeral: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं ४ एप्रिलला निधन झालं. वयाच्या ८७व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ५ एप्रिलला मनोज कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जुहू येथील पवनहंस स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिषेक बच्चनसह अमिताभ बच्चन आणि अरबाज खानसह वडील सलीम खान यांनी उपस्थिती लावली होती. तसंच प्रेम चोप्रा, रजा मुराद, बिंदू दारा सिंह, अनु मलिक, शहबाज खान आणि धीरज कुमार असे अनेक कलाकार मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान अभिषेक बच्चन एका पापाराझीवर संतापलेला पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अभिषेक बच्चनचा हा व्हायरल व्हिडीओ पवनहंस स्मशानातला आहे. व्हिडीओमध्ये एकाबाजूला अमिताभ बच्चन व सलीम खान यांची भेट होताना दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अभिषेक बच्चन संतापलेला दिसत आहे. दुःखाच्या प्रसंगात पापाराझींचा सततचा आवाज आणि फोटोंमुळे अभिषेक भडकल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी अभिषेक रागाच्या भरात फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला अडवतो आणि त्यानंतर दुसऱ्या पापाराझीला अभिनेता रागाने पाहात सुनावताना दिसत आहे. त्यामुळे तिसरा पापाराझी अभिषेकला शांत करून त्याला पुढे जाण्यासाठी सांगतो. मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारातील अभिषेक बच्चनच्या या व्हिडीओची खूप चर्चा होतं आहे.
अभिषेक बच्चनचा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अभिषेकने बरोबर केलं.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, अभिषेकने योग्य केलं. तो तिथे कुठल्या चित्रपटाच्या प्रमोशनला नव्हता आला. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अभिषेक जया बच्चन यांच्यासारखा वागत आहे.”
दरम्यान, ९ ऑक्टोबर १९५६ साली हिरो बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन वयाच्या १९व्या वर्षी मनोज कुमार यांनी दिल्लीहून मुंबई गाठली. १९५७ मध्ये पहिल्या चित्रपटात १९ वर्षांच्या मनोज कुमार यांनी एका ८०-९० वर्षांच्या भिकारीची छोटीशी भूमिका केली. सुरुवातीला हरिकिशन गोस्वामी असं मनोज यांचं नाव होतं, जे नंतर बदललं गेलं. बॉलीवूडमधील मोलाच्या योगदानासाठी मनोज कुमार यांना पद्मश्रीपासून ते दादासाहेब फाळकेपर्यंतचे पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.