अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. गेली अनेक वर्ष तो त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले. तर त्याच्या नावावर दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहेत.
अभिषेकने नुकतीच त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची वीस वर्षे पूर्ण केली. या वीस वर्षांमध्ये तो आपल्याला अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसला. त्याच्या कामाचा चाहत्यांनी तर कौतुक केलंच पण त्याचबरोबर त्याच्या कामामुळे आणि डेडीकेशनमुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही सहभागी झालं. एकच नाहीतर त्याच्या नावे दोन गिनीज रेकॉर्ड्स आहेत.
अभिषेकने ‘पा’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात मात्र अमिताभ बच्चन अभिषेकचे वडील आहेत. पण या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वडील मुलाच्या तर मुलगा वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. हा प्रयोग त्यापूर्वी भारतीय सिनेसृष्टीत कधीही झालेला नव्हता. तर या भूमिकेसाठी त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झालं. तर ‘दिल्ली 6’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी १२ तासांमध्ये भारतातील जास्तीत जास्त शहरांमधील कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेला अभिनेता म्हणून अभिषेकच्या नावे गिनीज रेकॉर्ड आहे.
दरम्यान अभिषेक बच्चनची काही दिवसांपूर्वी ‘ब्रीद: इन्टू द शॅडोज २’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. २०२० मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. लवकरच तो आता अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात दिसणार आहे.