Abhishek Bachchan : महानायक अमिताभ बच्चन व दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन मागील २५ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. एका सुपरस्टारचा मुलगा असल्याने अभिषेकची अनेकदा वडील अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना होते. त्याने विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केलं आहे, त्यामुळे बरेचदा पत्नीशीही तायची तुलना होते. आता त्याने या तुलनेबद्दल त्याला काय वाटतं, ते सांगितलं. तसेच त्याने वडिलांचं कौतुकही केलं.
आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या यशाची, कर्तृत्वाची जेव्हा तुलना केली जाते, तेव्हा त्याचा परिणाम होतो का? असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. “ते कधीच सोपं नसतं. पण २५ वर्षे हाच प्रश्न विचारला जात असल्याने आता मला सवय झाली आहे. जर तुम्ही माझी तुलना माझ्या वडिलांशी करत असाल तर तुम्ही माझी तुलना सर्वोत्तम व्यक्तीशी करत आहात. जर तुम्ही माझी तुलना सर्वोत्कृष्ट व्यक्तींशी करत असाल तर कुठेतरी कदाचित मी या महान नावांमध्ये गणला जाण्यास पात्र आहे, असं मला वाटतं. म्हणजे या तुलनेकडे मी तसं बघतो. माझे आई-वडील माझे आई-वडील आहेत, माझे कुटुंब माझे कुटुंब आहे, माझी पत्नी माझी पत्नी आहे आणि मला त्यांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणि ते जे करत आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे,” असं अभिषेक म्हणाला.
अभिषेकने वडिलांचे केले कौतुक
अभिषेकने वडील अमिताभ बच्चन यांचे त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. अभिषेक म्हणाला, “आपण इथे मुंबईतील एका छान एसी रूममध्ये बसून ही मुलाखत करत आहोत, छान कॉफी पीत आहोत आणि ते ८२ वर्षांचे सकाळी ७ पासून केबीसीसाठी शूटिंग करत आहेत. ते समाजासमोर एक उदाहरण आहेत. मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. रोज रात्री मी झोपायला जातो तेव्हा मला एवढंच वाटतं की जेव्हा मी ८२ वर्षांचा असेन तेव्हा माझ्या मुलीने माझ्याबद्दल असं म्हणायला हवं की, ‘माझे वडील ८२ वर्षांचे आहेत आणि अजूनही काम करत आहेत’.”
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो नुकताच ‘या वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटात झळकला होता. तो लवकरच शाहरुख खानबरोबर सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक वर्मा व सुहाना खानदेखील आहे. तसेच तो रेमा डिसुझाच्या ‘हॅप्पी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येतील.