बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. मात्र अजूनही त्यांच्यातील प्रेम हे कायम आहे. अभिषेकबरोबर लग्नानंतर ऐश्वर्याने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आता अभिषेकने तिच्या कामाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
ऐश्वर्या बच्चन ही सध्या तिच्या ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनने ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल भाष्य केले आहे. अभिषेक बच्चनने नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ऐश्वर्याचा अभिनय आणि चित्रपटाची कथा याबद्दल भाष्य केले आहे.
“‘पोन्नियिन सेल्वन २’ हा एक अतिशय चांगला चित्रपट आहे. माझ्याक़डे याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी फार आनंदी आहे. मणीरत्नम, चियान, विक्रम, तृषा आणि सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. त्या सर्वांना शुभेच्छा. मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. तिचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम”, असे ट्वीट अभिषेक बच्चनने केले आहे.
अभिषेक बच्चनच्या या ट्वीटवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. त्यात त्याने ऐश्वर्याच्या अभिनय करण्याबद्दल अभिषेकला एक सल्ला दिला आहे. “सर आता तुम्ही ऐश्वर्या रायला आणखी चित्रपट साईन करण्यास सांगायला हवे आणि आता तुम्ही आराध्याची काळजी घ्यायला हवी”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर अभिषेकनेही ट्वीट करत उत्तर दिले आहे.
“सर, तिने चित्रपट साईन करावेत?? तिला कोणतीही गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची अजिबात आवश्यकता नाही. त्यात तिला आवडणारे काम करण्यासाठी तर नाहीच”, असे ट्वीट करत अभिषेकने त्या नेटकऱ्याला उत्तर दिले आहे.
‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त चियान विक्रम, त्रिशा कृष्णन आणि अनेक कलाकारांनी काम केले आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजेच ‘पोन्नियिन सेल्वन १’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे.