Abhishek Bachchan: अभिषेक बच्चन शूजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना अभिषेकने त्याची मुलगी आराध्या बच्चन हिच्याबरोबरची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. त्यामुळेच आगामी चित्रपटासाठी प्रेरणा मिळाल्याचं अभिषेकने म्हटलंय.
आराध्या लहान असताना तिच्याकडे एक पुस्तक होते, त्यात एका पात्राने ‘मदत’ हा जगातील सर्वात धाडसी शब्द असल्याचं वर्णन केलं होतं. या पुस्तकातील ही कल्पना मनावर खोलवर रुजली, कारण मदत मागणे यातून चिकाटी आणि आव्हानांना तोंड देण्याची इच्छाशक्ती दिसून येते, असं अभिषेकने सांगितलं. “याचा अर्थ तुम्ही हार मानायला तयार नाही. पुढे जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन,” असं अभिषेक म्हणाला. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलंय.
हेही वाचा – वरुण धवनची हिरोईन गोव्यात करणार लग्न, १५ वर्षांपासून दुबईच्या बिझनेसमनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे कीर्ती
अभिषेकने याचा संबंध ‘आय वॉन्ट टू टॉक’मधील अर्जुन या त्याच्या पात्राशी जोडला आणि म्हणाला, “तो मदत मागायला घाबरत नाही. तो हॉस्पिटलमध्ये जायला घाबरत नाही. तो हार मानत नाही. ज्या व्यक्तीने ज्या गोष्टींचा सामना केला आहे आणि तो सामना करत आहे; त्याला ३१ वर्षांनंतर कंटाळा येणं आणि ‘खूप झालंय आता, मला हे आणखी नाही करायचं’ असं म्हणणं खूप सोपं आहे. पण नाही, तो अजूनही प्रयत्न करतोय. हीच गोष्ट त्याला खरोखर धाडसी बनवते.”
‘आय वॉन्ट टू टॉक’ मध्ये सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले शूजित सरकार व अभिषेक बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अभिषेकचे वडील व महानायक अमिताभ बच्चन यांनी पिकू (२०१५) आणि गुलाबो सिताबो (२०२०) या चित्रपटांमध्ये शूजित सरकार यांच्याबरोबर काम केलंय. या दोन्ही चित्रपटांचं खूप कौतुक झालं होतं. ‘पिकू’मधील भूमिकेसाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
‘आय वॉन्ट टू टॉक’मधील कलाकार
‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामध्ये अहिल्या बामरू, जॉनी लीव्हर, जयंत कृपलानी, पर्ल डे आणि क्रिस्टिन गोडार्ड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट या शुक्रवारी (२२ नोव्हेंबरला) रिलीज होणार आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत.
दरम्यान, अभिषेक बच्चनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या व ऐश्वर्या रायच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत आहेत. दोघेही वेगळे राहतात, असंही म्हटलं जात आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता, तर त्याच ठिकाणी ऐश्वर्या काही वेळाने मुलगी आराध्याबरोबर पोहोचली होती. तेव्हापासून या जोडप्याच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd