बॉलीवू़ड अभिनेता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) सध्या त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक'(I Want To Talk) या चित्रपटात अभिषेक बच्चनने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. २०२३ मध्ये आर बाल्की यांच्या ‘घूमर’ चित्रपटात वर्षभरापूर्वी अभिनेता दिसून आला होता. आता त्यानंतर या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाई कमी असली तरीही अभिनेत्याच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
काय म्हणाला अभिषेक बच्चन?
‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील अभिनयासाठी अभिषेक बच्चन चर्चेत असण्याबरोबरच तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन लग्नाच्या १७ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, असे म्हटले जात होते. त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.
आता एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने केलेले वक्तव्य सध्या चर्चांचा भाग बनले आहे. अभिषेक बच्चनने नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सकारात्मकतेविषयी, सतत काम करत राहण्याविषयी बोलताना म्हटले, “आयुष्य सतत बदलत असलं तरीही त्याचा जो गाभा आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे. जर वाईट वाईटपणा सोडत नसेल तर चांगल्याने चांगलं का सोडावं?(जब बुरा अपनी बुराई ना छोडे, तो अच्छा अपनी अच्छाई क्यूँ छोडे?)”
पुढे त्याने म्हटले, “कठीण काळात आशा शोधणे खूप अवघड असते. मात्र आयुष्य शाश्वत ठेवण्यासाठी हीच आशा प्रेरणा बनते.” याबरोबरच इतक्या भावनिक विषयावर शुजित सरकारने ज्या पद्धतीने चित्रपट बनवला आहे, त्यासाठी त्याने कौतुक केले. कोणतेही भावनिक दु:ख जास्त न मांडता उत्तम पद्धतीने हा चित्रपट शुजित सरकारने साकारला असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे.
दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर बोलताना अभिषेक बच्चनने, “हा चित्रपट निवडण्यापाठीमागे, या भूमिकेला होकार देण्यामागे आराध्या अनेक कारणांपैकी कारण आहे. कारण- मी एका मुलीचा पिता आहे. आराध्याचा वडील आहे. मी त्या भावना समजू शकतो”, असे म्हटले होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.