आपले वडील अमिताभ बच्चन यांच्या पडत्या काळात मुलगा अभिषेक बच्चन अमेरिकेतील कॉलेज सोडून भारतात आला खरा, पण याचदरम्यान त्याला जे.पी दत्ता यांनी ‘रेफ्यूजी’मध्ये मुख्य भूमिका देऊ केली अन् अभिषेकचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेकने त्याच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं, त्याने बऱ्याच दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. पण कोणताच दिग्दर्शक व निर्माता अमिताभ बच्चन यांच्या मुलाला लॉंच करायचं धाडस करू इच्छित नव्हता.
आपल्या वडिलांवर आणि कुटुंबावर आर्थिक संकट कोसळ्याचं समजताच अभिषेक अमेरिकेतील कॉलेज सोडून भारतात परतला. अमिताभ बच्चन यांची ‘एबीसीएल’ ही कंपनी डबघाईला आली होती, अमिताभ यांच्यावर प्रचंड कर्ज होतं, अशातच त्यांनी आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. त्यावेळी अभिषेकने आपल्या वडिलांच्या व्यवसायात दखल देत पैशांची बचत करायला सुरुवात केली.
आणखी वाचा : “चांगले कपडे घ्यायची ऐपत…” बिग बींनी दिवाळखोरी जाहीर केल्यानंतरच्या काळाबद्दल अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला
‘गल्लाटा प्लस’शी राऊंडटेबल मुलाखतीदरम्यान अभिषेक याने यासंदर्भात भाष्य केलं. जे.पी.दत्ता यांचा ‘रेफ्यूजी’ मिळण्याआधी अभिषेक आपल्या वाडिलांसाठी काम करत होता. त्यावेळी तो प्रोडक्शन सहाय्यक म्हणून काम बघायचा. सेटवर अभिषेक चहादेखील बनवायचा, अन् याच कामाच्या अनुभावातून अभिषेक छोट्या छोट्या गोष्टी शिकला. याबद्दलच त्याने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
अभिषेक म्हणाला, “मी त्यावेळी सेटवर पडेल ती कामं, मेहनत, धावपळ करायचो. मी सेटवर चहादेखील बनवायचो. माझा जवळचा मित्र सिकंदरचे वडील गौतम बेरी हे तेव्हा कंपनीचे सीइओ होते. त्यांनीच मला सेटवर येऊन चहा बनवायची कल्पना दिली. असं नेमकं का करायचं हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, सेटवर वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या वापरावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे कारण सर्वाधिक बील हे साखरेचं येत आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मी शिकलो आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो.”