अभिनेत्री तापसी पन्नू विवाहबंधनात अडकली आहे. तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोशी राजस्थानमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून तापसीच्या लग्नाची चर्चा होती. आता तिच्या एक को-स्टारने फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर तापसीचं लग्न झालं आहे, असं म्हटलं जात आहे.
तापसी माजी बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर दहा वर्षांपासून रिलेशनशिप होती. आता या जोडप्याने लग्न केल्याचं म्हटलं जातंय. तापसीने व मॅथियस यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं. पार्टीला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच हजर होते. अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों लग्नाला उपस्थित होते, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.
तापसीचा ‘थप्पड’ मधील सह-कलाकार पावेल गुलाटी याने लग्नाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिनेता अभिलाष थापियाल देखील दिसतोय. तापसी लवकरच मित्रांना मुंबईत लग्नाची पार्टी देणार आहे, अशी चर्चा आहे.
दरम्यान, “मला जेव्हा मुलं हवी असतील तेव्हाच मी लग्न करेन,” असं तापसी एका मुलाखतीत म्हणाली होती. तसेच ती फक्त एका दिवसात लग्न करेल, तिच्या लग्नाचा सोहळा खूप मोठा नसेल, असंही तिने सांगितलं होतं.