Aamir Khan met Santosh Deshmukh Son Video Viral : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख यांचे कुटुंबीय करत आहेत. अनेक लोक आणि राजकीय नेते देशमुख कुटुंबाची भेट घेत आहेत. याचदरम्यान आता बॉलीवूड अभिनेता आमिर खानने देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे.
अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. आमिरने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. आमिरचा देशमुख कुटुंबाबरोबरचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओत आमिर विराज व धनंजय यांच्याशी संवाद साधताना दिसतो. नंतर तो विराजला मिठी मारतो आणि धीर देतो. आमिरचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
पाहा व्हिडीओ –
‘फक्त न्यायाची अपेक्षा,’ ‘सॅल्यूट माणुसकी शिल्लक आहे कुठंतरी’, ‘शेवटी माणुसकी दाखवली धन्यवाद दादा’, ‘मुंडेंची अजून चौकशी का नाही? का त्यांचे व सर्व आरोपींचे व दोषी पोलिसांचे CDR काढत नाही,’ ‘कुठे गेले मराठी स्टार माणुसकी विकली का की अजूनही भीती आहे मुंडेची,’ ‘आमिर खान सर्व सामान्य वक्ती अवस्था आणि दशा समजून घेणारा व्यक्ती,’ ‘आमिर खानला पण माणुसकी आहे,’ ‘आमिर खान एक चांगली व्यक्ती’, ‘आम्हाला फक्त न्याय पाहिजे…. आरोपीला फाशी म्हणजे फाशीच झाली पाहिजे,’ अशा कमेंट्स आमिर खानच्या या व्हिडीओवर लोकांनी केल्या आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले होते. हे फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना आरोपींनी मारहाण केल्याचे फोटो व व्हिडीओ होते. संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती. आरोपींनी देशमुखांना मारहाण केली, तसेच त्यांच्यावर लघुशंकाही केली होती. संतोष देशमुखांचा छळ करत असताना आरोपी हसत होते.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलं आहे.