अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतु’ चित्रपटाचा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, थ्रीलर, रोमान्स पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील अक्षयचा नवा लूक व भूमिका पाहता प्रेक्षक चित्रपट प्रदर्शित कधी होणार? याची वाट पाहत आहेत. तर काहींना चित्रपटाचा ट्रेलर आवडला नसल्याचं चित्र दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Ram Setu Trailer : प्रतिक्षा संपली! अ‍ॅक्शन, थ्रीलर अन्…; अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरमधील संवाद विशेष लक्षवेधी आहेत. त्याचबरोबरीने चित्रीकरणासाठी निवडण्यात आलेले लोकेशनही कमालीचे आहेत. ट्रेलर पाहता चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या ट्रेलरमधील जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स विशेष लक्षवेधी आहेत.

चित्रपटाची कथा ही एका आर्कियोलॉजिस्टवर आधारित आहे. ‘राम सेतु’ खरंच अस्तित्वात होतं का? की ही निव्वळ काल्पनिक कथा आहे याचा शोध घेण्यासाठी अक्षयची निवड करण्यात येते. पण चित्रपटाचा ट्रेलर पाहून काहींनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रेलरच्या अखेरीस अक्षयच्या हाती असलेला दगड पाहून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचाही मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा ट्रेलर कंटाळवाणा असल्याचंही म्हटलं आहे. “ये देश राम के भरोसे चलता है”, “दुनिया मैं श्रीराम के लाखो मंदीर है पर सेतू एक” हे या ट्रेलरमधील संवाद सध्या विशेष गाजत आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor akshay kumar ram setu movie trailer release see audience review watch video kmd