अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ चित्रपट आज सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचे मागील काही चित्रपट सलग फ्लॉप झाले आहेत, याच दरम्यान अक्षयने त्याचे एक अपार्टमेंट विकल्याची माहिती समोर आली आहे. त्याने बोरीवली पूर्व येथील अपार्टमेंट विकले. त्याने २०१७ मध्ये ते अपार्टमेंट घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने शुक्रवारी एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच या व्यवहाराशी संबंधित मालमत्ता नोंदणी दस्तऐवजांची तपासणी केली आहे, असंही त्यात म्हटलं आहे. अक्षय कुमारने विकलेली मालमत्ता स्काय सिटीमध्ये आहे. स्काय सिटी हा ओबेरॉय रियल्टीने विकसित केलेला प्रकल्प असून तो २५ एकरांमध्ये पसरलेला आहे.

७८ टक्क्यांनी वाढली अपार्टमेंटची किंमत

“अक्षयने नोव्हेंबर २०१७ मध्ये २.३८ कोटी रुपयांना खरेदी केलेले अपार्टमेंट नुकतेच ४.२५ कोटी रुपयांना विकले. त्याने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा ७८ टक्के नफ्यासह त्याने हे अपार्टमेंट विकले,” अशी माहिती स्क्वेअर यार्ड्सने दिली आहे. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १०७३ चौरस फूट आहे. यात दोन गाड्यांची पार्किंगही आहे. या व्यवहारासाठी २५.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.

आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रेकॉर्डनुसार, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी ओबेरॉय स्काय सिटीमध्ये गुंतवणूक केली आहे.

अक्षय कुमार, त्याची पत्नी ट्विंकल खन्ना व त्यांचा मुलगा (फोटो – इन्स्टाग्राम)

८० कोटींच्या घरात राहतो अक्षय कुमार

‘स्काय फोर्स’ फेम अभिनेता सध्या त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांच्या दोन मुलांसह मुंबईतील जुहू येथे एका आलिशान सी-फेस डुप्लेक्समध्ये राहतो. या आलिशान घराची किंमत ८० कोटींहून अधिक आहे. अक्षय कुमारच्या या घरात सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध आहेत. या घरात एक होम थिएटर आणि एक सुंदर बाग आहे. तसेच त्याच्या घरातून अरबी समुद्र दिसतो.

जीक्यूच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारकडे खार पश्चिममध्ये जॉय लीजेंडमध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे. त्याने २०२२ मध्ये खार पश्चिम येथील या फ्लॅटसाठी ७.८ कोटी रुपये मोजले होते. अक्षय कुमारचा हा फ्लॅट या कॉम्प्लेक्सच्या १९ व्या मजल्यावर असून तो १८७८ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या ठिकाणी चार गाड्यांसाठी पार्किंगची जागा देखील आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor akshay kumar sold his apartment in mumbai hrc