अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. पठाणच्या यशानंतर या चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘फायटर’ चित्रपटातून हे दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २०२४ च्या सुरुवातीस प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आता या चित्रपटाबद्दल एका प्रसिद्ध अभिनेत्याने मोठं विधान केलं आहे.
अभिनेता अक्षय ओबेरॉय या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात धमाकेदार ॲक्शन सीन्स असणार आहेत. या चित्रपटातले हे ॲक्शन सीन्स ‘पठाण’पेक्षा वरचढ असतील असं अक्षय म्हणाला आहे.
आणखी वाचा : हृतिक रोशनने चाहत्यांकडे केली मोठी मागणी; म्हणाला, “कृपया मला…”
अक्षयने नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “‘फायटर’ हा हॉलिवूडच्या एरियल ॲक्शन एंटरटेनर्सच्या बरोबरीचा असेल. सिद्धार्थ आनंदच्या व्यतिरिक्त अभिनेता आणि अभिनेत्रीला उत्कृष्टप्रकारे स्क्रीनवर दुसरं कोणीही आणू शकत नाही. शाहरुख खानने ‘पठाण’मध्ये तर हृतिकने वॉरमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. सिध्दार्थ चित्रपटात कलाकार कसा दिसतोय आणि स्टाईल काय करतो याकडेही बारीक लक्ष देतो.”
या चित्रपटात ‘पठाण’पेक्षा काय वेगळं पाहायला मिळणार हे सांगताना तो म्हणाला, “या चित्रपटात अशा अनेक वेगळ्या गोष्टी असतील ज्या सिद्धार्थने ‘पठाण’च्या अनुभवावरून शिकल्या असतील. ‘पठाण’मध्ये भरपूर ॲक्शन आणि व्हीएफएक्स सीन होते त्यातून सिद्धार्थला बरंच काही शिकता आलं. याबाबतीत ‘फायटर’ ‘पठाण’पेक्षा वरचढ असेल. या चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर अमेरिकेतून आलेले आर्टिस्ट काम करत आहेत. या चित्रपटात अशी ॲक्शन पाहायला मिळणार आहे जी प्रेक्षकांनी याआधी कधीही पाहिली नसेल. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.” या चित्रपटाचं तब्बल २५० कोटी रूपयांचं बजेट असणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिलीज करण्यात येणार आहे.