Manoj Kumar Passes Away: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८७व्या वर्षी मनोज कुमार यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीवर आधारित असलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांना लोक प्रेमाने ‘भारत कुमार’ म्हणून म्हणायचे. मनोज कुमार एक असे कलाकार होते; ज्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मनोज यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्यापैकी सर्वाधिक कमाई करणारे १० चित्रपट कोणते? ज्यांनी सर्व रेकॉर्ड्स मोडले, अशा चित्रपटांविषयी जाणून घेऊया…
दस नंबरी
मनोज कुमार यांचा ‘दस नंबर’ चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार यांच्यासह हेमा मालिनी आणि अमरीश पुरी यांच्यासारखे तगडे कलाकार मंडळी होते. या चित्रपटाने भारतात १४.७१ कोटींची कमाई केली होती.
क्रांती
१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्रांती’ एक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात अभिनयासह निर्मिती आणि दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केलं होतं. ‘क्रांती’ चित्रपटात मनोज यांच्या व्यतिरिक्त दिलीप कुमार, शशि कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि परवीन बॉबी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. जवळपास ३.१ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने भारतात १० कोटींचं कलेक्शन केलं होतं. तसंच जागतिक स्तरावर एकूण १६ कोटींचा गल्ला जमवला होता.
रोटी, कपडा और मकान
मनोज कुमार यांचा ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट १९७४ साली प्रदर्शित झाला होता. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारताचा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला ऑल टाइम ब्लॉकबस्टर म्हणून घोषित केलं होतं. ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपटाने भारतात ५.२५ कोटींची कमाई केली होती.
पूरब और पश्चिम
१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पूरब और पश्चिम’ चित्रपटाने भारतात ४ कोटी ५० लाखांची कमाई केली होती. हा चित्रपट १९७० मध्ये भारतातल्या बॉक्स ऑफिसवरील चौथा सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. या चित्रपटात अभिनयासह दिग्दर्शनाची धुरा मनोज यांनी सांभाळली होती. ‘पूरब और पश्चिम’ चित्रपटात त्यांच्याबरोबर सायरा बानो झळकल्या होत्या.
उपकार
‘उपकार’ चित्रपट १९६७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार, आशा पारेख आणि प्रेम चोप्रा मुख्य भूमिकेत झळकले होते. ‘उपकार’ या चित्रपटाने भारतात ३.४० कोटींची कमाई केली होती.
बेईमान
१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेईमान’ चित्रपटात मनोज कुमार यांच्यासह राखी गुलजार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटाने भारतात ३.११ कोटींची कमाई केली होती.
गुमनाम
‘गुमनाम’ चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २.६ कोटींची कमाई केली होती. त्या काळातला भारतातला हा आठवा चित्रपट होता, ज्याने सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटात मनोज कुमार यांच्यासह नंदा, महमूद, प्राण, हेलेन, मदन पुरी, तरुण बोस, धूमल आणि मनमोहन अहम महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.
हिमालय की गोद में
१९६५ मध्येच ‘हिमालय की गोद में’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार यांच्यासह माला सिन्हा मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाने भारतात २.२५ कोटींची कमाई केली होती.
नील कमल
नील कमल या चित्रपटात मनोज कुमार यांच्या व्यतिरिक्त वहीदा रहमान आणि राजकुमार मुख्य भूमिकेत झळकले होते. १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १.८० कोटींचा गल्ला जमवला होता.