बॉलीवूड अभिनेता अंगद बेदीने दुबई येथे झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स २०२३ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. अंगदने हे पदक त्याचे दिवंगत वडील क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांना समर्पित करत अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा- Video: रोनाल्डोने सलमान खानकडे केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “आता याचं करिअर…”
अंगदने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अंगदने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं “माझ्यात हिंमत नव्हती. ना माझे शरीर तयार होते पण एका बाह्य शक्तीने मला पुढे जाण्यास भाग पाडले. तो माझा सर्वोत्तम काळ नव्हता किंवा मी चांगल्या फॉर्ममध्येही नव्हतो. पण कसं तरी मी हे करुन दाखवलं. हे सुवर्णपदक नेहमीच खास असेल. माझ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद बाबा. मला तुमची नेहमी आठवण येते. तुमचा मुलगा.” या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी अंगदचे अभिनंदन केले आहे.
अंगदचे वडील बिशन सिंग बेदी यांचे २३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा- सोनम कपूर दुसऱ्यांदा गरोदर? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
अंगदच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकताच तो ‘घूमर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अंगदबरोबर त्याचे वडील बिशन सिंग बेदींनीही अभिनय केला होता. याशिवाय त्याचा हाय नाना चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार नानी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरची मुख्य भूमिका आहे.