प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर सलमान युसूफ खानने बुधवारी बंगळुरू विमानतळावर घडलेला एक प्रकार सांगितला आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला. आपल्याला कन्नड येत नसल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्याने अपमान केला, असा आरोप सलमानने केला आहे. त्याने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो गुलाबी रंगाचा टी-शर्ट, जॅकेट आणि टोपी घालून दिसत होता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला टॅग करत त्याने लिहिले, “दुबईला जाताना मी एका इमिग्रेशन अधिकाऱ्याला भेटलो, तो माझ्याशी कन्नडमध्ये बोलत होता. मी माझ्या मोडक्या तोडक्या कन्नडमध्ये आपल्याला भाषा समजते पण बोलता येत नाही, असं म्हणालो. तरीही तो माझ्याशी फक्त कन्नडमध्येच बोलत होता आणि मला माझा पासपोर्ट दाखवत तुझा आणि तुझ्या वडिलांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला आहे आणि तुला कन्नड बोलता येत नाही, असं म्हणाला. तसेच मी तुमच्यावर संशय घेऊ शकतो असंही म्हणाला.”
“त्याच्या बोलण्याचा मला याचा राग आला आणि मी त्याला विचारलं की कोणत्या कारणाने तू माझ्यावर संशय घेऊ शकतो. मी बंगळुरूत जन्मलो असलो तरी मी कुठेही प्रवास करू शकतो. माझं शिक्षण परदेशात झालं आहे. माझी मातृभाषा हिंदी आहे आणि मी ती बोलू शकतो. आपल्या पंतप्रधानांना देखील कन्नड भाषा येत नाही,” असं आपण त्या अधिकाऱ्याला बोलल्याचं सलमानने सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणी तक्रार करण्यासाठी विमानतळावर गेलो असता कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. उलट तुम्हाला ऑनलाइन तक्रार करावी लागेल असे सांगण्यात आले. या व्हिडीओत सलमान त्या अधिकाऱ्यावर प्रचंड रागावला होता. मला भाषेवरून इतका त्रास दिला, तर इतरांचा विचार करा, असं तो म्हणाला. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जिथे चाहते त्याचं समर्थन करताना दिसत आहेत.