बॉलिवूडमध्ये असे कित्येक अभिनेते आहेत ज्यांनी हातावर मोजण्याइतकेच चित्रपट केले अन् लोकप्रिय झाले, पण त्यापैकी प्रत्येकालाच ती लोकप्रियता टिकवता आली नाही. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता डिनो मोरिया. ‘राझ’ या हॉरर चित्रपटामुळे डिनोला खरी ओळख मिळाली शिवाय या चित्रपटातील त्याची आणि अभिनेत्री बिपाशा बसूची केमिस्ट्रीसुद्धा लोकांना पसंत पडली. नंतर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली अन् कालांतराने डिनो मोरिया हे नाव विस्मरणात जाऊ लागलं.
मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डिनो मोरियाने करिअरमध्ये केलेल्या चुकांची कबुली दिली होती. केवळ पैशांचा मागे धावणाऱ्या डिनोने तेव्हा बरेच चित्रपट केवळ पैसे कमावण्यासाठी केले हे त्याने या मुलाखतीमध्ये मान्य केले होते. आता पुन्हा एका मुलाखतीमध्ये डिनोने बॉलिवूडमधून मिळणाऱ्या कामावर भाष्य केलं आहे. सध्या तो कोणताही चित्रपट स्वीकारत नाहीये यामागील कारण त्याने स्पष्ट केलं.
आणखी वाचा : “महिलांचे ओठ आणि गाल…” ‘जुबली’स्टार वामिका गब्बीचा चित्रपटसृष्टीबद्दल मोठा खुलासा
‘डिएनए’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिनो म्हणाला, “खरं सांगायचं तर मी इथे काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण मला अत्यंत वाईट अशा ऑफर्स येत आहेत. सध्या जे काम माझ्याकडे येत आहे ते फार चांगलं नाही. जर मी तशी कामं पुन्हा केली तर माझे चाहते मला प्रश्न विचारतील. त्यामुळे मी सध्या सावधपणे अशा भूमिका स्वीकारतो आहे ज्या माझ्या करिअरला एक पाऊल पुढे नेण्यात मदत करतील, ज्या भूमिका मला पाच पावलं मागे ओढतील अशा भूमिकांना मी साफ नकार देत आहे.”
‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून डिनोने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता काही वेबसीरिज आणि प्रादेशिक चित्रपटात डिनो काम करत आहे. ‘द एंपायर’ या वेबसीरिजमधील त्याच्या कामाची खूप प्रशंसा झाली. नुकतंच डिनोने ‘एजेंट’ या दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं. शिवाय ओटीटीवरील ‘तांडव’ आणि ‘हॉस्टेजेस’सारख्या वेबसीरिजमधून त्याने त्याच्यातील अभिनयाची चुणूक दाखवली आहे.