लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शाह ही चित्रपट निर्माते विपुल शाह यांची पत्नी आहे. या जोडप्याला आर्यमन व मौर्य ही दोन मुलं आहेत. विपुल यांच्याशी लग्न करण्याआधी शेफालीचं लग्न १९९४ मध्ये अभिनेता हर्ष छायाशी झालं होतं. दोघांनी ‘हसरतें’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. पण लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाला जवळपास २४ वर्षे झाली आहेत. शेफालीपासून घटस्फोट घेतला तो काळ खूप कठीण होता, असं हर्ष छायाने म्हटलं आहे.
घटस्फोटानंतर हर्षने बंगाली अभिनेत्री सुनीता गुप्ताशी लग्न केलं. शेफालीबरोबरचा घटस्फोट हा विषय आता माझ्यासाठी संपलाय, असं त्याने म्हटलं. “ती खूप जुनी गोष्ट आहे. आता २०-२५ वर्षे उलटून गेली आहेत. माझ्यासाठी आता तो विषय संपला आहे,” असं हर्ष म्हणाला. दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाही असं हर्षने सांगितलं. “आम्ही मित्र नाही. मला तिच्याशी बोलण्यात काही अडचण नाही, त्यामुळे जर आम्ही कधी एकमेकांच्या समोर आलो तर मला अस्वस्थ वाटणार नाही,” असं हर्ष म्हणाला.
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
यापूर्वी ‘हिंदुस्तान टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत हर्षने सांगितलं होतं की घटस्फोटाची वेळ येणार आहे, अशी जाणीव त्याला आधीच झाली होती. “मला खूप त्रास झाला. पण खरं तर घटस्फोटाबद्दल मला आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण घटस्फोटाची वेळ येणार आहे, हे मी जवळजवळ आठ महिने पाहत होतो. मी त्या घटस्फोटाकडे खूप व्यावहारिकपणे पाहतो. दोन लोक भेटले, प्रेमात पडले, लग्न केलं आणि वेगळे झालं. त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही. तुमचं लग्न कुठे चाललंय हे तुम्हाला माहित नसेल तर तसं एकत्र जगण्यापेक्षा विभक्त झालेलं कधीही चांगलं. वाईट वाटून घेतल्यानंतर आणि स्वतःसाठी पुरेशी सहानुभूती मिळवल्यानंतर सहा महिन्यांत मी घटस्फोटाच्या दुःखातून बाहेर पडलो,” असं तो म्हणाला होता.
शेफाली एकदा म्हणाली होती की लोकांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल फारसा विचार केला नव्हता. “मी त्या नात्याला माझ्या आयुष्यातील बराच काळ दिला होता. मी त्या नात्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मला वाटायचं की लग्न झाल्यानंतर सगळीकडे आनंदच असतो, पण तसं नाही याची जाणीव मला नंतर झाली. काही काळानंतर, तुम्हाला कळतं की तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि आजूबाजूच्या प्रत्येकासाठी काय चागलं आहे. मला एका सेकंदासाठीही असं वाटलं नाही की मी त्याला खूप वेळ दिला. मी प्रयत्न केले पण ते लग्न नाही टिकलं तर वेगळे झालो,” असं शेफाली पिंकव्हिलाच्या मुलाखतीत म्हणाली होती.