गेल्या काही वर्षात ओटीटी हे मनोरंजनाचे एक महत्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. प्रेक्षक कोणत्याही ठिकाणी ओटीटीवर उपलब्ध असलेला कार्यक्रम पाहू शकतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित झालेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील सिरीजनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या वेबसीरिजमधूनच काही अभिनेत्यांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यापैकीच एक दांडगा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत जयदीप हे बरीच वर्षं चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिका साकारत आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने आणि ओटीटीवरील ‘पाताळ लोक’ या वेबसीरिजने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
जयदीप यांनी नुकताच आयुष्मान खुरानाबरोबर ‘अॅन अॅक्शन हीरो’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं समीक्षकांनी कौतुक केलं, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणकून आपटला. नुकतंच याविषयी जयदीप अहलावत यांनी भाष्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना जयदीप यांनी याबद्द खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “नक्कीच मला वाईट वाटतं. खासकरून या चित्रपटाचा दिग्दर्शक अनिरुद्धसाठी वाईट वाटतं कारण हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. लोकांनी चित्रपटगृहात या चित्रपटाकडे ज्याप्रमाणे पाठ फिरवली ते पाहून मला कुठेतरी हे चुकीचं वाटतं.”
आणखी वाचा : कार्तिक आर्यनची जादू फिकी; बॉक्स ऑफिसवर ‘शहजादा’ ठरला अपयशी; दुसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी
पुढे ते म्हणाले, “त्यानंतर हा चित्रपट जेव्हा ओटीटीवर आला, लोकांनी तो आवडला, पसंत पडला तेव्हा मला प्रचंड रागही आला. असं नेमकं का घडलं हे आम्हाला नाही माहीत, हा एक टिपिकल बॉलिवूड मसाला चित्रपट होता ज्यात सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी लोकांनी त्याकडे कानाडोळा केला. आजवर मला अशी एकही व्यक्ती भेटली नाही जी मला म्हणाली असेल की हा चित्रपट अत्यंत टुकार आहे.”
जयदीप यांनी ‘राझी’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘कमांडो’सारख्या चित्रपटात वेगवेगळ्या लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. याबरोबरच त्यांची ‘पाताळ लोक’ ही वेबसीरिजही चांगलीच गाजली. नुकतंच मार्वेल कॉमिकच्या एका ऑडिओ पॉडकास्टसाठी जयदीप अहलावत यांची निवड झाली आहे. याबरोबरच ते लवकरच सुजॉय घोष यांच्या नव्या प्रोजेक्टमधून समोर येणार आहेत. यामध्ये जयदीप यांच्यासह करीना कपूर खानही झळकणार आहे.