चित्रपटसृष्टीतील कलाकारांची त्यांनी सिनेमात साकारलेल्या भूमिकांमुळे चर्चा होताना दिसते. अनेक कलाकार एखाद्या भूमिकेतून त्यांच्या अभिनयाची छाप सोडतात. त्यांची वेगळी ओळख निर्माण करतात. ‘किस्मत’, ‘आतंक ही आतंक’, ‘नागिन’, ‘ये आग कब बुझेगी’, ‘सलामी’, ‘क्रांती’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेते कबीर बेदी(Kabir Bedi) ओळखले जातात. आता मात्र एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले कबीर बेदी?
ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी नुकतीच ‘डिजिटल कॉमेंट्री’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या मुलाच्या निधनाबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना कबीर बेदी यांनी म्हटले, “माझ्या मुलाची शोकांतिका ही होती की, तो खूप हुशार मुलगा होता. अमेरिकेच्या सगळ्यात महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये त्याचे अॅडमिशन झाले होते. त्यानंतर त्याला स्किझोफ्रेनिया (schizophrenia)चे निदान झाले. माझ्या पुस्तकात सिद्धार्थच्या शेवटच्या दिवसांबद्दल मी लिहिले आहे. एक गोष्ट आहे. एक वडील त्याच्या मुलाला आत्महत्या करण्यापासून कसे थांबवतो, यावर ती गोष्ट आहे. तुम्ही विचार करा की, मला काय वाटले असेल. अशा परिस्थितीत काय होते, हे अंत:करणापासून लिहिले आहे आणि शेवटी मी ही लढाई जिंकू शकलो नाही. कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी शोकांतिका हीच आहे”, असे म्हणत कबीर बेदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. १९९७ मध्ये त्यांचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६ व्या वर्षी आत्महत्या केली होती.
कबीर बेदींनी ‘स्टोरीज आय मस्ट टेल : द इमोशनल लाइफ ऑफ अॅन अॅक्टर’ (Stories I Must Tell : The Emotional Life of an Actor) हे पुस्तक लिहिले आहे. याआधी ‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, जे काही मी पुस्तकात लिहिले आहे ते अंत:करणापासून लिहिले आहे. माझ्याबरोबर ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्यासुद्धा मी सविस्तरपणे लिहिल्या आहेत. त्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. कारण- ते खरे आहे; लपवण्यासारखे काही नाही.
अपयशाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, मी चुकीची गुंतवणूक केल्यामुळे मला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला. हे सगळे तेव्हा झाले, जेव्हा माझा मुलगा स्किझोफ्रेनियाचा सामना करीत होता. मी माझ्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला; पण मी त्याला थांबवू शकलो नाही. त्याबद्दल माझ्या मनात अपराधीपणा होता. त्याच वेळी मी आर्थिक संकटाचाही सामना करीत होतो. मी ऑडिशनसाठी जायचो; मात्र काय करायचे हेच मला माहीत नसायचे. माझ्या अशा अवस्थेमुळे मी खूप कामे गमावली. मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो. तिथून मी परत स्वत:ला कसे उभे केले, हा माझ्या प्रवासाचा भाग आहे.
दरम्यान, कबीर बेदींनी १९७१ मध्ये ‘हलचल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर १९८० च्या दशकात त्यांनी इटालियन टीव्ही शो व चित्रपटांतदेखील कामे केली. १९९० मध्ये पुन्हा त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली.