‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप काही भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी महिन्यात जंतरमंतरवर विनेश फोगाट, बजरंग पुनियांसह अनेक खेळाडूंनी आंदोलनंही केली. पण, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्ती संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाबद्दल अभिनेता केआरकेने प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव
“ही बाब अत्यंत दुखः देणारी आहे! राजकारण बाजूला ठेवा! आम्ही आमच्या मुली व बहिणींना न्यायही देऊ शकत नाही का? हा अहंकार योग्य नाही! केवळ स्त्रीच्या सन्मानासाठी रामाने रावणाचा वध केला होता! रावणाप्रमाणे तुम्हालाही हा अहंकार बुडवू नये!” असं ट्वीट त्याने आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंचा फोटो शेअर करत केलंय.
बृजभूषण सिंह यांच्यासह इतर आरोपींवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी हे आंदोलनकर्ते खेळाडू करत आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. तसेच त्यांनी न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, याची मागणी करण्यासाठी विनेश फोगाटसह सात इतर खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.