अभिनेता मानव कौल हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली. त्यानंतर तो ‘तुम्हारी सुलू’, ‘जॉली एलएलबी २’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. त्याच्या कामाबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला आहे. गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. आता त्या सगळ्यावर त्यानं भाष्य केलं आहे.
टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम मुंबईतील जीत नगर परिसरातील शिव मंदिराबाहेर त्यांच्यावर १६ गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी मानव कौलचा संघर्षाचा काळ सुरू होता. त्याला चित्रपटात काम करून नाव कमवायचं होतं. अशातच त्याला पोलिसांनी पकडलं.
आणखी वाचा : फक्त ‘आदिपुरुष’च नाही तर ‘हम आपके है कौन’मध्येही प्रदर्शनानंतर करण्यात आला होता ‘हा’ मोठा बदल, कारण…
सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी काही मुलांबरोबर दहिसरमध्ये एका खोलीत राहायचो. तेव्हा पैशाची चणचण होती. आम्ही सगळी मुलं नाश्त्याचे पैसे वाचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागायचो आणि सकाळी उशिरा उठून थेट जेवायलाच बसायचो. चित्रपटामध्ये काही काम मिळतंय का हे शोधण्यासाठी आम्ही फिल्म स्टुडिओमध्ये जायचो. आम्हाला असं एकत्र पाहून सर्वांनाच धक्का बसायचा. त्याच सुमारास टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांची कोणीतरी गोळ्या झाडून हत्या केली.”
पुढे तो म्हणाला, “त्यांच्या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी लोकांना उचलून नेण्यास सुरुवात केली. एका रात्री मी मित्रांसोबत पत्ते खेळत असताना पोलिस आले आणि आम्हाला घेऊन गेले. आम्हाला दहिसर पोलिस ठाण्यात नेऊन, त्यांनी चौकशी सुरू केली. एका अधिकाऱ्यानं मला विचारलं, “तुझा कट्टा कुठे आहे? तू काश्मिरी आहेस?” मी एक नाटकात काम करणारा कलाकार आहे हे मी त्यांना समजावत होतो. त्यांनी आमची चौकशी केली आणि शेवटी आम्हाला सोडून दिलं.” मानव कौलचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.