अभिनेते मनोज बाजपेयी हे बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेते आहेत. आतापर्यंत अनेक विविध विषयांवरील चित्रपटांतून त्यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांची हिंदी भाषेवरही मजबूत पकड आहे. सध्या ते त्यांच्या ‘एक बंदा काफी है’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या हिंदी बोलण्याचं अनेकदा कौतुक केलं जात असलं तरीही त्यांच्या मुलीला अजिबात हिंदी बोलता येत नाही, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
ते म्हणाले, “माझी मुलगी पूर्णपणे अंग्रेज आहे. मी तिच्यावर कितीही रागावलो तरीही ती हिंदी बोलत नाही. माझे चित्रपट बघून ते हिंदी शिकेल असं मला वाटलं होतं पण तिला माझे चित्रपट बघायलाही आवडत नाहीत. एकदा मी तिला ‘बागी २’ च्या सेटवर घेऊन गेलो होतो. तिथे सर्वांनी तिचे भरपूर लाड केले. एकदा तर तिने ॲक्शनही म्हटलं. नंतर ती माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आली आणि तिने मला विचारलं की टायगर कुठे आहे? ती हिंदी शिकत नाही पण हिंदी चित्रपटातील अभिनेते तिच्या आवडीचे आहेत.”
पुढे ते म्हणाले, “तिच्या हिंदी न बोलण्यामुळे शिक्षकही निराश झाले आहेत. यावरून अनेकदा शिक्षक तिला ओरडले आहेत. पालकसभेत देखील त्यांनी याबद्दल तक्रार केली आहे. एकदा त्यांनी तिला विचारलं की, तुझ्या वडिलांचे नाव काय? तर ती म्हणाली, मेरा पापा… तिचं हे बोलणं ऐकून मला अक्षरशः लाज वाटली.”
मनोज बाजपेयी यांचं हे बोलणं सध्या खूप चर्चेत आलं आहे. त्यांच्या या बोलण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर नेटकरी सोशल मीडिया वरून यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.