‘लगता है मैं आपको पहले कहीं देखा है?’ हे वाक्य एक डॉक्टरला बरेच रुग्ण विचारायचे. त्यामुळे त्याने एक व्हिडीओ शेअर करून त्याला लोकांनी कुठे पाहिलंय, याचा खुलासा केला. या डॉक्टरचे नाव आहे मिकी धमजानी आणि त्याने एका चित्रपटात काम केलं आहे. तुम्ही हृतिक रोशनचा ‘क्रिश’ चित्रपट पाहिला असेल. यात हृतिकच्या बालपणीची भूमिका मिकीने केली आहे. त्यामुळे मिकीकडे येणारे रुग्ण आम्ही तुला कुठेतरी पाहिलंय, असं म्हणत असतात.
मिकी धमजानी आता मोठा झाला असून चित्रपटांमध्ये नाही तर मेडिकल क्षेत्रात कार्यरत आहे. तो नेत्रचिकित्सक आहे. मिकीने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर करून त्याचा प्रवास सांगितला आहे. मिकीने रीलमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमाती बालकलाकार ते आता डॉक्टर होण्यापर्यंतचा आश्चर्यकारक प्रवास दाखवला. या रीलमध्ये ‘क्रिश’मधील फुटेज तसेच हृतिक आणि त्याचे चित्रपट निर्माते वडील राकेश रोशन यांच्याबरोबरचे फोटोही पाहायला मिळतात. राकेश रोशन यांनी २००६ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
“तुम्ही मला आधी पाहिलं आहे का? हो नक्कीच तुम्ही मला पाहिलं आहे! मला ज्युनियर क्रिशची भूमिका करण्याची आणि एका सुपर टॅलेंटेड कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात काम करणं खूप आनंददायी होतं. या चित्रपटात बाल कलाकार होण्यापासून ते नेत्र चिकित्सक बनण्यापर्यंतचा माझा प्रवास नक्कीच विलक्षण होता,” असं मिकीने लिहिलं आहे.
“हे ट्रांझिशन वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेलं होतं, त्यातूनच मी आज जे आहे ते घडलो आहे. माझ्या अभिनयाच्या दिवसांपासून मिळालेले धडे माझ्या डोळ्यांची काळजी घेण्याच्या कामात प्रेरणा देत आहेत आणि या अनोख्या वाटेवरील प्रत्येक पावलाबद्दल मी ग्रेटफूल आहे. मी आता तुमच्या डोळ्यांची काळजी घेणारा सुपरहिरो बनू शकेन,” असं मिकीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या
मिकीने ही रील शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे. “त्याने हृतिक रोशनबरोबर एका चित्रपटात काम केलं, पण तरीही तो त्याच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी डॉक्टर झाला,” अशी मिश्किल कमेंट एका युजरने केली आहे. “कोई मिल गया चित्रपटात जादू आला आणि त्याने क्रिशच्या वडिलांचा चष्मा काढला, आता ज्युनियर हृतिक डोळ्यांचा डॉक्टर झाला,” अशीही एक कमेंट यावर चाहत्याने केली आहे.