चित्रपटातील एखादा सीन किंवा डायलॉग खूप लोकप्रिय झाला की त्याचे मीम टेम्प्लेट होते. अनेकदा आपणही मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना त्या डायलॉगचा वापर करत असतो. अशाच असंख्य डायलॉगपैकी एक डायलॉग ‘गोलमाल ३’ या चित्रपटात आहे. ‘अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है’ हा डायलॉग तुम्हीही कधी ना कधी नक्कीच वापरला असेल किंवा मीम पाहिलं असेल, आज या डायलॉगमागची कहाणी जाणून घेणार आहोत.
चित्रपटात हा डायलॉग अभिनेता मुकेश तिवारीने म्हटला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल सीरिजमध्ये वसुलीभाई ही भूमिका करणाऱ्या मुकेशला या डायलॉगबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा हा डायलॉग चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये नव्हता, तर आपण वेळेवर म्हटल्याचा खुलासा मुकेश तिवारीने केला आहे.
“मला खरंच पनवेलला जायचं होतं. श्रेयस तळपदे जरा वेळ घेत होता. मला गोव्याहून पनवेलला जायचं होतं, माझी फ्लाईट होती. हा सीन सकाळी १० वाजता आम्ही शूट करत होतो. माझा मूळ डायलॉग असा होता की क्या हुआ? तुम लोगों पे गोलियां चली? पण श्रेयसचे पात्र अडखळत बोलणारे होते, त्यामुळे तो उत्तर द्यायला बराच वेळ घेत होता. मग मी त्याला ‘अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है’ असं म्हटलं. नंतर दिग्दर्शकांनी हा डायलॉग तसाच ठेवला,” असं मुकेश तिवारी म्हणाला.
दरम्यान, मुकेश तिवारीला गोव्याहून परत पनवेलला यायचं होतं. सीन शुट करताना अचानक सुचलं आणि तो डायलॉग आपण म्हटला. नंतर दिग्दर्शकांनी तो डायलॉग तसाच वापरला, असं मुकेश तिवारीने सांगितलं.