ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांनी बॉलीवूडमधील वेतनाच्या असमानतेबाबत खुलासा केला आहे. ‘वेलकम’ चित्रपटासाठी अक्षय कुमारच्या कर्मचार्यांना जेवढे पैसे दिले गेले होते त्यापेक्षा कमी पगार त्यांना मिळाला होता, असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांना विमानात इकोनॉमीमध्ये प्रवास करावा लागला होता आणि अक्षयच्या स्टाफसाठी जे हॉटेल बूक केलं होतं, तिथेच आपली सोय करण्यात आली होती, असं मुश्ताक यांनी नमूद केलं.
‘डिजिटल कॉमेंटरी पॉडकास्ट’ मध्ये मुश्ताक यांनी ‘वेलकम’ चित्रपटात अक्षयपेक्षा खूप कमी मानधन मिळाल्याबद्दल त्यांचं मत मांडलं. “माझे मानधन चित्रपटातील अक्षय कुमारच्या स्टाफपेक्षाही कमी असेल. दुर्दैवाने आपले चित्रपट ‘स्टार्स’वर खूप पैसा खर्च करतात. आम्ही सगळीकडे स्वतःहून जातो, आम्ही इकोनॉमीमध्ये प्रवास करतो आणि निर्मात्यांनी बूक केलेल्या हॉटेलमध्ये राहतो. दुबईमध्ये मला जे हॉटेल देण्यात आले होते, त्याच हॉटेलमध्ये अक्षयचा स्टाफ राहत होता. मोठ्या चित्रपटांमध्ये असं खूप घडतं,” असं मुश्ताक खान म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “पण अनेक चित्रपट निर्मात्यांना ही विषमता संपवायची आहे. मी ‘स्त्री २’ नावाचा चित्रपट करत आहे आणि हा चित्रपट करताना मला खूप प्रेम मिळाले. ते सर्वांची खूप काळजी घेतात. आम्ही एकत्र खूप मजा केली. मी अलीकडेच ‘रेल्वे मेन’ सीरिज केली, ती करतानाही मला चांगले अनुभव वाटले. प्रॉडक्शनच्या लोकांनी खूप आदर दिला. नवीन पिढीतील प्रॉडक्शन टीम आणि कलाकारही चांगले काम करत आहेत.”
‘वेलकम’चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते आणि हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात कतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर यांच्याही भूमिका होत्या. दरम्यान, बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री स्त्री-पुरुष वेतनातील तफावतीवर बोलत असतात. प्रियांका चोप्रानेही या वेतन असमानतेवर भाष्य केलं होतं.