‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह प्रमुख कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी बॉलीवूडमधील सद्यस्थिती आणि चित्रपटांबद्दल भाष्य केलं.
‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्याला नाना पाटेकर यांना समांतर (पॅरलल) आणि व्यावसायिक चित्रपटांमधील फरक विचारण्यात आला. याविषयी सांगताना अभिनेते म्हणाले, “पूर्वीच्या काळी समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये जो फरक होता तो आता राहिलेला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रत्येक चित्रपटांना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे. सध्या समांतर चित्रपटाची अवस्था वाईट आहे.”
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “अलीकडेच सध्याचा हिट चित्रपट पाहायला मी चित्रपटगृहात गेलो होतो. पण, खरं सांगू का? तो चित्रपट मी पूर्णपणे पाहू शकलो नाही. पुन्हा-पुन्हा तेच विषय दाखवून प्रेक्षकांना गृहीत धरलं जात आहे. वेगळे विषय दाखवले जात नाहीत.”
हेही वाचा : “मोठ्या बॅनरचे चित्रपट कधीच मिळाले नाहीत”, शिल्पा शेट्टीने व्यक्त केली खंत; म्हणाली, “बॉलीवूडमध्ये फक्त…”
नाना पाटेकर बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दल मत मांडताना म्हणाले, “आता मी एका अभिनेता आहे आणि माझ्या मुलाला सुद्धा अभिनेता व्हायचं आहे. अशावेळी समोरच्याची कुवत असो वा नसो… प्रेक्षकांवर अशा कलाकारांचे सिनेमे लादले जातात. एक चित्रपट चालला नाही, तर दुसरा बनवला जातो. दोन्ही सिनेमे चालले नाहीत, तर आणखी १० चित्रपट बनवले जातात. कालांतराने लोक अशा कलाकारांना स्वीकारू लागतात. १० चित्रपट बनवून एक दिवस हे कलाकार आपल्या डोक्यावर बसतात. त्यांचे अतिशय वाईट चित्रपट प्रेक्षकांना पाहावे लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुमच्यासमोर ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा दोन्ही चित्रपटांमधील फरक दिसून येतो.”