मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे बराच काळ चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. गेली काही वर्षं नाना पाटेकर यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिल्याचं आपण पाहिलं, पण नाना यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तुम्हाला माहितीये का की नाना यांना एक हॉलिवूड चित्रपटासाठीही विचारणा झाली होती. दिग्दर्शक अनुराग कश्यप याने नुकताच याबद्दल खुलासा केला आहे.
‘द लल्लनटॉप’शी संवाद साधताना अनुरागने आजवर नानासह काम न केल्याबद्दल खुलासा केला आहे. बरीच वर्षं ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत, पण आजवर कधीच त्या दोघांनी एकत्र काम केलेलं नाही. मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी अनुरागनेच एका दिग्दर्शकाची नानाशी गाठ घालून दिली असल्याचंही अनुरागने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.
आणखी वाचा : “मी येतोय…” मनोज बाजपेयीच्या खास व्हिडिओची चर्चा; ‘फॅमिली मॅन ३’साठी चाहते उत्सुक
ख्रिस स्मिथ या दिग्दर्शकाच्या ‘द पूल’ या चित्रपटात नानाने छोटी भूमिका निभावली होती. या चित्रपटाला बरेच सन्मानही मिळाले. यातील नाना यांचं काम पाहून ऑस्कर विजेता दिग्दर्शक रीडले स्कॉटने नाना यांना आपल्या चित्रपटात घेण्याची इच्छा व्यक्त केली.रीडले स्कॉटला त्याच्या ‘बॉडी ऑफ लाइज’ या चित्रपटात हॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकॅप्रिओ आणि रसल क्रोवबरोबर नाना पाटेकर यांनादेखील घ्यायचे होते.
याविषयी बोलताना अनुराग म्हणाला, “रीडले स्कॉटने ‘द पूल’मधील नाना यांचं काम पाहून मला इ-मेल केला होता. त्याला नानाला आपल्या चित्रपटात घ्यायचं होतं. हा प्रस्ताव घेऊन मी स्वतः नाना यांच्याकडे गेलो. पण ही एका दहशतवाद्याची भूमिका आहे त्यामुळे ती करण्यास नाना यांनी नकार दिला. मी ही गोष्ट प्रथमच सांगत आहे.” या कारणामुळे नाना यांनी ही ऑफर नाकारली होती. नाना पाटेकर सध्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटातून नाना पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.