परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. मागच्या ४० वर्षांहून अधिक काळापासून ते आपल्या विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. परेश मनोरंजनाबरोबरच राजकारणातही सक्रिय आहेत. ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असतात. परेश रावल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात, पण त्यांच्या पत्नी मात्र एकेकाळी फॅशन जगतातलं मोठ नाव असूनही सिनेसृष्टीच्या झगमगाटात फारशा दिसत नाहीत.
सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. त्यादिवशी परेश रावल पत्नी स्वरूप यांच्यासह मतदानासाठी पोहोचले होते, तेव्हा दोघेही पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. स्वरूप संपतही या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत, तर आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
परेश रावल यांची दोन्ही मुलं काय करतात? स्वतःच केला खुलासा; म्हणाले, “त्यांनी माझ्या नावाचा…”
परेश रावल यांच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत आहे. स्वरुप यांनी टीव्हीवरही काम केलं आहे. ‘ये जो है जिंदगी’ या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या स्वरूप संपत या परेश रावल यांची पत्नी आहेत. स्वरूप संपत या ब्युटी क्वीन देखील राहिल्या आहेत. त्या माजी मिस इंडिया आहेत. त्यांनी १९७९ साली मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. यानंतर त्यांनी मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भाग घेतला होता. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करिश्मा’ चित्रपटात स्वरूप यांच्या बिकिनी लूकची प्रचंड चर्चा झाली होती.
स्वरूप संपत आणि परेश रावल हे दोघेही रंगभूमीवर काम करायचे, यादरम्यान दोघांची भेट झाली. परेश आणि स्वरूप हे दोघेही १९७५ मध्ये पहिल्यांदा भेटले होते. परेशला पाहताक्षणी स्वरूप यांच्या प्रेमात पडले आणि तिच्याशीच लग्न करणार असं आपल्या मित्राला म्हणाले होते. एकेदिवशी परेश स्टेजवर परफॉर्म करत असताना स्वरूप यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडल्या. त्या बॅक स्टेजवर जाऊन परेश यांच्याबद्दल विचारू लागल्या. परेश आणि स्वरूप भेटले, स्वरूप यांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मग स्वरुप व परेश यांनी १९८७ साली लग्न केलं.
परेश व स्वरूप यांना आदित्य व अनिरुद्ध नावाची दोन मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. तर स्वरूप या उत्तम अभिनेत्री व लेखिका आहेत. त्या दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. त्यांनी वर्सेस्टर विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतली आहे.