अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला ‘तेजस’ हवाई दलाचे पायलट तेजस गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे कंगनाने जोरदार प्रमोशन केले होते. पण प्रेक्षकांनी मात्र ‘तेजस’ चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिक्सवर कंगनाच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.२५ कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट तब्बल ४५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर धिम्या गतीने सुरू झालेली ‘तेजस’ची कमाई पाहता, हा खर्च वसूल करणे कठीण जाईल, असं चित्र निर्माण झालं आहे. यासाठी आता स्वतः कंगनाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन ‘तेजस’ पाहण्यासाठी विनंती केली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांना ही विनंती केली आहे.
हेही वाचा – “आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज अन्…”, ‘कोकण हार्टेड गर्ल’वर ‘त्या’ व्हिडीओमुळे टीकेचा भडीमार
कंगनाचा हाच व्हिडीओ रिट्विट करत अभिनेते प्रकाश राज यांनी तिची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, “भारताला आताच २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं आहे. कृपया प्रतिक्षा करा. तुमच्या चित्रपटाला वेग येईल.”
कंगना व्हिडीओमध्ये काय म्हणाली होती?
कंगना आपल्या व्हिडीओत म्हणाली, “नमस्कार मित्रांनो. काल आमचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते खूप कौतुक करत आहेत. पण मित्रांनो, कोविडनंतर आपली हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे सावरलेली नाही. प्रेक्षक ९९ टक्के चित्रपटांना संधी सुद्धा देत नाहीत. मला माहित आहे की, या आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे. घरात टीव्ही आहे.”
हेही वाचा – …म्हणून भरत जाधव यांना आहे गाड्यांची हौस; वडिलांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती तेव्हा…
पुढे कंगना म्हणाली, “सुरुवातीपासूनच थिएटर हा आपल्या सभ्यतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर, माझी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की, जर तुम्ही याआधी ‘उरी’, ‘मेरी कॉम’ आणि ‘नीरजा’ सारख्या चित्रपटांचा आस्वाद घेतला असेल तर तुम्हाला ‘तेजस’ देखील खूप आवडेल. जय हिंद.”