बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक ईडीच्या रडारवर आहेत. बेटिंग ॲपचं प्रमोशन केल्यामुळे रणबीरला हे समन्स पाठवण्यात आलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपप्रकरणी ईडीकडून रणबीर कपूरला ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महादेव बेटिंग अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या लग्नात आणि सक्सेस पार्टीला कोणाची उपस्थिती होती याचाही तपास ईडीकडून सुरू आहे. रणबीर कपूरशिवाय किमान १५ ते २० सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली अजगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, ऍली अवराम, भारती सिंह, सनी लिओनी, भाग्यश्री, पुलकित- क्रिर्ती, नुसरत भारूचा, कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेव गेमिंग-बेटिंग हा ऑनलाइन सट्टेबाजी करण्याचा अॅप आहे. या अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याचं लग्न फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE)झालं होतं. या लग्नात तब्बल २०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडीओ भारतीय तपासयंत्रणांच्या हाती लागला. त्याच्या लग्नात सहभागी झालेल्या सगळे सेलिब्रिटी तपासयंत्रणांच्या रडारवर आले आहेत.