रणजीत हे भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी लोकप्रियता मिळविली. त्यांनी ऑनस्क्रीन साकारलेल्या पात्रांसाठी त्यांना खूपदा खऱ्या आयुष्यात प्रेक्षकांची व कुटुंबियांची नाराजी सहन करावी लागली. ‘एएनआय’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अभिनेते-चित्रपट निर्माते राज कपूर यांना त्यांच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा भेटल्याची आठवण सांगितली. राज कपूर अभिनेत्रींना मांडीवर बसवून सीन समजावून सांगायचे, असं रणजीत म्हणाले.
राज कपूर खऱ्या आयुष्यात जसे बोलायचे तसेच ते ऑनस्क्रीन बोलत होते, असं रणजीत यांनी सांगितलं. “मी त्यांच्या स्टुडिओत गेल्यावर तिथे त्याकाळच्या सर्व अभिनेत्रींचे मोठमोठे कटआउट्स पाहिले होते. एकदा ते स्टुडिओमध्ये आले आणि म्हणाले ‘सॉरी गोली जी!’ ते अतिशय सुंदर होते. त्यांचा रंग गोरा होता आणि त्याचे गाल लाल होते. त्यांचे डोळे खूपच सुंदर होते,” अशी राज कपूर यांच्याबरोबरच्या भेटीची आठवण रणजीत यांनी सांगितली.
“मेरा नाम जोकर सिनेमातील अभिनेत्रीला राज कपूर यांनी मांडीवर बसवून सीन समजावून सांगितले होते, असं त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं. ते प्रेमाने सीन समजावून सांगायचे, अभिनेत्रींशी अजिबात फ्लर्ट करायचे नाही. ते अभिनेत्रीला आपल्या मांडीवर बसायला सांगायचे तेव्हा तिला ‘पुत्तर’ (मुलगी) म्हणायचे,” असं रणजीत म्हणाले. राज कपूर यांच्यासह ‘मेरा नाम जोकर’मध्ये सिमी गरेवाल, ऋषी कपूर, केसेनिया रायबिन्किना, पद्मिनी, मनोज कुमार आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
या मुलाखतीत रणजीत यांनी त्याकाळच्या बॉलीवूड पार्ट्या कशा व्हायच्या याबद्दल सांगितलं. “माझे आई-वडील दिल्लीत राहत होते आणि मी जुहूला राहत होतो, त्यामुळे सगळे माझ्या घरी संध्याकाळी जमायचे. रीना रॉय माझ्या घरी येऊन पराठे बनवायची, परवीन बाबी माझ्या घरी येऊन ड्रिंक्स बनवायची, मौसमी चॅटर्जी मासे बनवायची, नीतू सिंग भिंडी बनवायची. घरातील वातावरण खूप छान असायचं. सुनील दत्त, राज कुमार, संजय खान, फिरोज खान, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा हे अभिनेतेही यायचे. राजेश खन्ना एका रात्रीत एक ते दोन बाटल्या दारू प्यायचे. उशीरापर्यंत पार्टी केल्याने सर्वजण दुसऱ्या दिवशी उशीरा शूटिंगला पोहोचायचे. ते १० वाजताच्या शिफ्टसाठी दोन वाजता पोहोचायचे,” असं रणजीत यांनी सांगितलं.