बॉलीवूडमध्ये हिरोंप्रमाणे काही खलनायकही अतिशय लोकप्रिय आहेत. शक्ती कपूर, प्रेम चोपडा यांच्याच काळातील आणखी एक लोकप्रिय खलनायक म्हणजे अभिनेते रणजीत. रणजीत यांनी त्या काळात आपली खास शैली आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांवर ठसा उमटवला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या पडद्यामागील आयुष्याबाबत आणि करिअरशी संबंधित अनेक किस्से उलगडले. याच मुलाखतीत त्यांनी सुनील दत्त आणि नर्गिस यांच्याबरोबरचा एक खास अनुभव सांगितला.

‘टाईमआऊट विथ अंकित’ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत रणजीत यांनी सांगितले की, मुंबईत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची पहिली भेट सुनील दत्त यांच्याशी झाली. त्यावेळी सुनील दत्त यांनी रणजीत यांना त्यांच्या घरी नेले, जिथे त्यांची पत्नी, अभिनेत्री नर्गिस यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली.

हेही वाचा……म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा

रणजीत म्हणाले, “सुनील दत्त यांचे काही मित्र घरी आले होते आणि नर्गिसजींनी ‘मटका गोष्त’ नावाचा एक खास पदार्थ बनवला होता. मला त्यावेळी मुंबईत येऊन फक्त दोनच दिवस झाले होते. रात्री दोन वाजेपर्यंत पदार्थ पुन्हा पुन्हा गरम केले जात होते. शेवटी नर्गिसजींनी जरा रागात आम्हाला सांगितले, ‘किती पिणार तुम्ही? अन्न पुन्हा गरम होणार नाही’, तेव्हा सगळे आत गेले. परंतु, त्या रात्री मला इतक्या मोठ्या व्यक्तींची भेट घेतल्याचा आनंद झाला होता.”

रात्रीच्या त्या प्रसंगात नर्गिस यांनी स्वतः पाहुण्यांची सेवा केली, हे पाहून रणजीत खूपच आश्चर्यचकित झाले. इतकी मोठी स्टार अभिनेत्री पाहुण्यांसाठी स्वतः काम करत असल्याचं पाहून त्यांना खरोखर धक्का बसला.

हेही वाचा…“तू धर्मांतर केलंस”, ७ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केल्याने आताही ट्रोल होते अभिनेत्री; म्हणाली, “मी हिंदू आहे आणि…”

“मला आठवतंय, सुनील दत्त साहेबांनी मला मटण वाढलं. मी त्यांना सांगितलं की मी मांसाहार करत नाही, तेव्हा त्यांनी हसत म्हटलं, ‘नर्गिसजींनी स्वतःच्या हातांनी बनवलंय, तू खायलाच हवं.’ त्यांनी मजेत म्हटलं, ‘तू शाकाहारी आहेस हे खरं, पण शेळी तर गवतच खात असेल ना!'”

मदर इंडियाच्या स्टारने आम्हाला जेवण वाढलं

“मी नर्गिसजींना रात्री दोन वाजता पाहुण्यांची सेवा करताना पाहिलं, तेव्हा मला विश्वासच बसला नाही. माझ्या डोक्यात त्या ‘मदर इंडिया’च्या हिरोइन होत्या आणि मी समजत होतो की त्या आता आराम करत असतील, परंतु त्या जाग्या होत्या, मदतनीसाला डाळीला फोडणी द्यायला सांगत होत्या आणि स्वतः सर्वांना जेवण वाढत होत्या. मला खरंच विश्वास बसत नव्हता की नर्गिसजींनी मला पराठा दिला!”, असे रणजीत हसत म्हणाले.

हेही वाचा…“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”

अभिनेते रणजीत यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि नर्गिस यांचं लग्न १९५८ मध्ये झालं होतं. १९८० मध्ये नर्गिस यांना कर्करोगाचं निदान झालं आणि एक वर्षानंतर त्यांचं निधन झालं. काही दिवसांनी त्यांच्या मुलाने, संजय दत्तने ‘रॉकी’ या चित्रपटातून सिनेमात पदार्पण केलं. सुनील दत्त यांचं निधन २००५ साली झालं.