बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखला जातो. रणवीर सिंग हा त्याच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. नुकतंच रणवीरला ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ असा पुरस्कार मिळाला. या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने ‘महाराष्ट्र माझे घर, माझा अभिमान’ असेही म्हटले.
रणवीर सिंग हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. याचे पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. “महाराष्ट्र माझे घर, माझा अभिमान! भारतातील दिग्गज नेते श्री एकनाथ शिंदे, श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री प्रमोद सावंत यांच्याकडून हा प्रतिष्ठित सन्मान मिळाल्याबद्दल विनम्र आहे. धन्यवाद”, असे रणवीर सिंगने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी सलग ११-१२ तास…” घश्याचा कर्करोगाच्या चर्चांवर दिशा वकानीने दिलेलं स्पष्टीकरण
“सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रीयन ऑफ द इअर. मी खूप गर्वाने सांगू इच्छितो की मी महाराष्ट्रात जन्मलो आहे. हे माझे कार्यस्थान आहे. जन्मभूमी, मातृभूमी, कर्मभूमी हे सर्व महाराष्ट्र आहे. मी आज जे काही आहे ते महाराष्ट्र राज्यामुळे आहे. माझे पूर्ण अस्तित्व या राज्याशी जोडलेले आहे.
मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातून मी कायमच आपल्या माणसांची सेवा करण्यासाठी हजर असेन. मी हा अॅवॉर्ड अमिताभ बच्चन यांना समर्पित करतो. मला लहानपणापासूनच अमिताभ बच्चन व्हायचे होते. आजपण मला अमिताभ बच्चन व्हायचे आहे आणि पुढेही अमिताभ बच्चन होण्याचे स्वप्न बघत आहे. जेणेकरुन वयाच्या ८० व्या वर्षीही अभिनय करत आहे”, असे रणवीर सिंग म्हणाला. ‘लोकमत’ या वृत्तपत्राने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
आणखी वाचा : आधी नाना पाटेकरांच्या पाया पडला अन् नंतर…, रणवीर सिंगचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
दरम्यान रणवीर सिंगच्या ‘८३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मे २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जयेशभाई जोरदार’ फ्लॉप झाला. या चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वी योग्य पद्धतीने प्रमोशन केले नाही, त्याचा परिणाम झाला, असेही बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. पुढच्या वर्षी त्याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.