प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाचे ट्वीट करत ही बातमी दिली. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. नुकतंच अभिनेता रितेश देशमुख याने एक भावूक ट्वीट केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धाजंली वाहताना दिसत आहे. नुकतंच रितेश देशमुखने एक ट्वीट केले आहे. यात त्याने सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“माझा अजूनही विश्वास बसत नाही की तुम्ही आमच्यात आता नाही. तुमच्या हसण्याचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. एक दयाळू आणि उदार सहकलाकार असल्याबद्दल तुमचे आभार आणि एक शिक्षक झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमची नेहमी आठवण येत राहील. तुमचा वारसा आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील”, असे रितेश देशमुखने म्हटले आहे.
दरम्यान सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. सतीश कौशिक यांनी त्यांच्या ४ दशकांच्या कारर्किदीत जवळपास १०० चित्रपटात काम केलं. सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’, ‘तेरे नाम’, ‘क्योंकि’, ‘ढोल’ आणि ‘कागज’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
तर ‘मिस्टर इंडिया’, ‘मोहब्बत’, ‘जलवा’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘अंदाज’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘साजन चले ससुराल’, ‘दिवाना मस्ताना’, ‘परदेसी बाबू’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’, ‘राजा जी’, ‘आ अब लौट चलें’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘चल मेरे भाई’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.