अभिनेता सैफ अली खानवर जानेवारी महिन्यात चाकूने हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील काही दिवस सैफ अली खान डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. मुंबईतील राहत्या घरी सैफवर हा हल्ला झाला. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात झालेल्या या हल्ल्याला आता काही काळ लोटला असून सध्या सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळतेय.
अशातच सैफ अली खानने त्याच्यावर झालेल्या या हल्ल्याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. सैफने ‘ई टाइम’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना म्हटलं आहे, “माझ्यावर झालेल्या त्या भयानक हल्ल्यानंतर मी आता अधिक सावध झालो आहे. आता घराचे खिडकी-दरवाजे बंद करताना मी काळजीपूर्वक लक्ष देतो. प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यातून मी बचावलो, यासाठी कृतज्ञ आहे.” आपल्याकडे खूप काही असूनसुद्धा खूप काही नसते, असे त्याने पुढे म्हटले आहे.
या एकंदरीत घटनेबद्दल अधिक बोलताना सैफ पुढे म्हणाला, “आता मी पूर्वीपेक्षा अधिक सावध झालो असून, माझ्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देतो. पूर्वी मला माझ्या अवतीभवती सुरक्षा रक्षक असलेलं आवडायचं नाही; परंतु आता मला त्याची गरज असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी मला सुरक्षा रक्षकांबरोबरच वावरावं लागेल.”
राहत्या घरात झालेल्या हल्ल्यामधून बाहेर आल्यानंतर सैफ “मी त्यातून बचावलो यासाठी खरंच ऋणी आहे. कदाचित माझी वेळ अजून आली नव्हती. कदाचित मी अजून काही चांगले चित्रपट करणार असेन. कुटुंबीय, मित्र यांच्यासह मी अजून काही काळ व्यतीत करणार असेन” असं त्यानं म्हटलं आहे.
सध्या सैफ अली खान त्याच्या ‘ज्वेल थीफ – द हेस्ट बिगिन्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचं पाहायला मिळतं. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘ज्वेल थीफ – द हेस्ट बिगिन्स’ या चित्रपटात जयदीप अहलावत, निकिता दत्ता, कुणाल कपूर यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत.