हिंदी सिनेसृष्टीत गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘शोले’ चित्रपट होय. या सिनेमातील सर्व भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. या सिनेमातील इतर पात्रांबरोबरच ठाकूरची भूमिका साकारणारे अभिनेता संजीव कुमार यांचा अभिनय आणि संवाद लोकांच्या आजही लक्षात आहे. संजीव कुमार त्या काळातील आघाडीचे अभिनेते होते. ते पडद्यावरील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांना खऱ्या आयुष्यात चमचमीत पदार्थ खाण्याची खूप आवड होती. त्यांनी मांसाहारी जेवणाचा आनंद घेण्यासाठी एक वेगळे घर घेतले होते. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
सचिन पिळगांवकर यांनी कुणाल विजयकर यांच्या “खाने में क्या है” या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “संजीव कुमार यांनी मांसाहारी जेवण करण्यासाठी एक वेगळे घर घेतले होते.” ते पुढे म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय शुद्ध शाकाहारी होते आणि घरात मांसाहार करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी पाली हिल परिसरात १-बीएचके फ्लॅट फक्त मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी भाड्याने घेतला होता.”
अभिनेते सचिन यांनी हा किस्सा सांगण्याआधी अभिनेत्री अंजू महेंद्रू यांनीही संजीव कुमार यांच्या मांसाहाराच्या आवडीबद्दल सांगितले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “हरी (संजीव कुमार) हे खाण्याचे प्रचंड शौकीन होते. चांगले पदार्थ आणि जेवण हेच त्यांच्यासाठी सगळं काही होतं. ते जरी गुजराती ब्राह्मण असले तरी त्यांना मांसाहारी पदार्थ खूप आवडायचे. ते नेहमी त्यांच्या घराबाहेर मांसाहार करायचे. ते कधीकधी माझ्या घरी यायचे आणि आम्ही त्यांच्या आवडीच्या मांसाहारी पदार्थांचे जेवण बनवायचो.”
सकाळी पाच पर्यंत जेवायचो
सचिन यांनी त्या काळातील आठवणींना उजाळा देताना सांगितले, “त्यावेळी संजीव कुमार, शम्मी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, रणधीर कपूर आणि मी असे सगळे एकत्र जमून खाण्याचा आनंद घेत असायचो. ते पाया आणि निहारी मागवायचे. हे जेवण आम्हाला ४-५ वेळा गरम करावे लागत असे. कारण आम्ही पहाटे ५ वाजेपर्यंत बसून पीत असायचो आणि त्यानंतर नानबरोबर पायाचा आस्वाद घ्यायचो.”
हेही वाचा…“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”
मौसमी चॅटर्जी यांनी सांगितला किस्सा
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी देखील २०१९ मध्ये एफटीआयआयच्या एका कार्यक्रमात संजीव कुमार हे खवय्ये असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “हरिभाई (संजीव कुमार) यांना मांसाहार खूप आवडायचा, परंतु ते त्यांच्या घरी खाऊ शकत नव्हते. ते कधी माझ्या घरी यायचे आणि माझा नवरा आणि मी बाहेर जायला निघालो असलो तरी, ते म्हणायचे, ‘मी काही चित्रपट बघायला आणलेत, तुमच्या फ्रीजमध्ये काही नॉन व्हेज आहे का?’
हेही वाचा…‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारच्या घरात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने ठरवलं होतं होणाऱ्या बाळाचं नाव
संजीव कुमार यांनी ‘शोले’, ‘आंधी’, ‘खिलौना’, ‘अंगूर’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या. १९८५ साली, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्याचं निधन झाल.