मराठीसह बॉलिवूडमध्येही अभिनेता म्हणून आपलं स्थान बळकट करणारा कलाकार म्हणजे शरद केळकर. शरदने १९ वर्षांच्या करिअरमध्ये विविध माध्यमांमध्ये उत्तम काम केलं. भारदस्त आवाज ही त्याची मुख्य ओळख. व्हॉईस ओव्हर आर्टिस म्हणूनही शरदला बरीच प्रसिद्धी मिळाली. पण हा संपूर्ण प्रवास शरदसाठी काही सोपा नव्हता. त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
शरदने एका मुलाखतीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मी पहिल्यांदा सुट्टीसाठी मुंबईमध्ये एका चुलत भावाच्या घरी राहायला आलो होतो. त्याचदरम्यान एका फॅशन शोसाठी मला फोन आला. वांद्रे येथे एका रुममध्ये आम्ही नऊ मुलं एकत्र राहायचो. तिथेच एक राजस्थानी हॉटेल होतं. दोन रुपये एक चपाती आणि अंड मिळायचं. मी थोड्या दिवसांनी धडपड करुन एका गॅस सिलेंडरची व्यवस्था केली. सकाळी चार अंडी व दोन चपाती तसेच परत संध्याकाळीही माझं हेच जेवण असायचं. २५ रुपयांमध्ये मला हे मिळायचं”.
“सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये स्वतःचा खर्च निघावा म्हणून मी जीम ट्रेनर म्हणून काम केलं. जीम ट्रेनर म्हणून काम करत असताना मला २७५० रुपये पगार होता. एका फॅशन शोसाठी फक्त तीन मिनिटं चालायचं होतं. त्या तीन मिनिटांसाठी मला पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार होतं. मी लगेचच ती ऑफर स्वीकारली”.
शरदने जेव्हा छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या हाती पैसे येऊ लागले. फोटोशूट किंवा एखाद्या जाहिरातीमध्ये काम मिळाल्यानंतर थोडे फार पैसे शरदला मिळायचे. पण छोट्या पडद्यापासून त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अगदी कठीण प्रसंगांचा सामना करणारा शरद आज सगळ्यांचा आवडता आणि सुप्रसिद्ध अभिनेता आहे.