अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणावर आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला होता. आज कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला असून सर्व आरोपांतून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
“पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं. विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी या खटल्यातील पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन हा निकाल दिला.
जिया खानच्या आईने केले होते आरोप
जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. मुलीला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.
राबिया खान यांच्या म्हणण्यानुसार, जियाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली होती. ३ जून २०१३ रोजी २५ वर्षीय जियाचा मृतदेह तिच्या जुहू येथील घरातून सापडला होता. राबिया यांनी सूरजविरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सूरजला अटकही केली होती. त्यानंतर १० वर्षे तपास सुरू होता. या प्रकरणात सीबीआयने हस्तक्षेप केला होता. आता एका दशकानंतर कोर्टात सुनावणी पार पडली व सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून मुक्तता करण्यात आली.