सध्या अनेक सेलिब्रिटी कपल्स आई-बाबा झाल्याचं पाहायला मिळतंय. दीपिका-रणवीर, वरुण-नताशा या जोडप्यांच्या घरी त्यांच्या बाळाचं आगमन झालं. अशातच या जोडप्यांपाठोपाठ अजून एक जोडी आई-बाबा झाली. ही जोडी म्हणजे भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल व अथिया शेट्टी. अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया हिने नुकतच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तसेच राहुल व अथिया यांनी त्यांच्या मुलीचं नुकतंच नामकरणसुद्धा केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करीत त्यांनी याबाबत माहिती दिली होती.

राहुल व अथिया यांनी त्यांच्या मुलीचं नाव ‘इवारा’ असं ठेवलं आहे. एतकंदरीत सध्या संपूर्ण शेट्टी कुटुंबात आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतं. अशातच सुनील शेट्टी यांनी आजोबा झाल्याबद्दलचा त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. सुनील शेट्टी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना सांगितलं, “इवारा माझ्यासाठी अथियाप्रमाणेच आहे. तर, जे जे मला अथियासाठी करता आलं नाही. जे जे मी तिला देऊ शकलो नाही ते सगळं मला इवारासाठी करायचं आहे. माझ्या कामामुळे मी पूर्वी खूप व्यग्र असायचो. त्यामुळे मुलांना तितका वेळ देता आला नाही; पण आता मी माझा सगळा वेळ इवाराला देणार आहे.”

याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “मी व सुनीता आम्हा दोघांना बऱ्याच काळापासून नातवंडे हवी होती. त्यामळे इवाराचं आमच्याबरोबर असणं ही आमच्यासाठी जगातील सर्वोत्तम भावना आहे. आणि मी इवाराचा आजोबा होण्यापेक्षा मोठं काहीतरी कधीही अनुभवलं नव्हतं. सुनील शेट्टी यांची मुलगी अथियाबद्दल बोलायचं झाल्यास, अथिया शेट्टीनं २०१५ साली ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘मुबारकान’, ‘चकनाचूर’, ‘नवाबजादे’ यांसारख्या चित्रपटात झळकली होती. पण, त्यानंतर मात्र अथिया अभिनय क्षेत्रात फार सक्रिय दिसली नाही.

दरम्यान, सुनील शेट्टी लवकरच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातून अक्षय कमार, सुनील शेट्टी, परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकत्र येणार असल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये उत्सुकता आहे. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सुनील शेट्टी नादानियां या चित्रपटात खूशी कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते.