अनेक चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना काम मिळत नाहीये. त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे. अनेक ऑडिशन देऊनही मनासारखं काम मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीत टिकू यांनी विविध प्रकारच्या भूमिका करत आपल्या अष्टपैलू अभियनाची झलक प्रेक्षकांना दाखवली. मात्र ‘दिल है के मानता नहीं’, ‘बोल राधा बोल’, ‘अंदाज अपना अपना’, ‘इश्क’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘पार्टनर’ यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ते सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’मध्येही त्यांनी शाहरुख खानचे वडील धरमदासची भूमिका साकारली होती. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत टिकू म्हणाले की इंडस्ट्रीत इतकी वर्षे काम केल्यानंतर सध्या ते थोडे बेरोजगार आहेत आणि अजूनही चांगल्या भूमिकांच्या शोधात ऑडिशन देत आहेत.
टस्फोटाच्या घोषणेनंतर प्रियांका चोप्रा व जाऊबाई सोफी टर्नर यांचंही बिनसलं? एकमेकींना सोशल मीडियावर….
टिकू म्हणाले, “मी खरं तर मागे वळून पाहत नाही. जसं काम मिळतं तसं मी ते हाती घेतो आणि पुढे जात राहतो. पण हो, मी खूप छान वेळ घालवला आहे. मी भाग्यवान आहे. मी आतापर्यंत माझ्या प्रवासाचा आनंद घेतला आहे, आणि मला आशा आहे की माझ्या कामाचा आनंद मी घेत राहीन.” टिकू गुजराती नाटकं आणि सिनेमांमध्ये काम करून स्वतःला व्यग्र ठेवत आहेत. पण काम मिळणं कठीण झाल्याचं ते सांगतात.
“मी इंडस्ट्रीपासून दूर झालो नाही, पण मला चित्रपट मिळाले पाहिजे. मला शोभेल अशी चित्रपटात माझी भूमिका असावी. अर्थात मला काम करायला आवडते. मी निवृत्ती घेतली असं नाही. पण मला काही ऑफर मिळायला हव्यात ना. माझ्यासाठी कोणतीही भूमिका नाही, मग मी काम कसं करू?” असा प्रश्न टिकू यांनी विचारला.
“मी नियमितपणे काम शोधत असतो. माझ्याकडे एक एजंट आहे, स्क्रिप्ट्स आणि नाटकं शोधणारी टीम आहे. ते मला कळवतात, मग जर मला ऑडिशनसाठी जायचे असेल तर मी जातो. आता गोष्टी बदलल्या आहेत, पण धीर धरायला हवा. करोनापासून कामाची पद्धत बदलली आहे. लोक अधिक क्रिएटीव्ह होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मलाही काम करायचं आहे, लोक मला कॉल करतील याची मी वाट पाहत आहे. मी कामाच्या शोधात असलेला अभिनेता आहे, असं मी सर्वांना सांगत आहे. कारण एखादी योग्य भूमिका असेल तर मला ती करायला आवडेल,” असं टिकू म्हणाले.